मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी महिला आयोगाकडे आपलं लेखी उत्तर दिलं आहे. तनुश्रीने लावलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असा दावा नानाने केला. सध्या प्रकरण पोलिसांत दाखल आहे. ही कायदेशीर लढाई असून आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, असं नानाने म्हटलं आहे. नानाचं पत्र मिळाल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने दहा वर्षापूर्वी हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या शूटिंगदम्यान नाना पाटेकरने गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तनुश्रीने मुंबईतील ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तनुश्रीने नाना पाटेकरांसह, हॉर्न ओके प्लीज सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तनुश्रीच्या आरोपानंतर #MeToo ही मोहीम सुरु झाली. याप्रकरणाची दखल महिला आयोगानेही घेतली आहे.
तनुश्रीने झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीनंतर या प्रकरणाने उचल घेतली. बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातील महिलांनी मीटू मोहिमे अंतर्गत आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाला वाचा फोडली.
तनुश्रीच्या आरोपानुसार हॉर्न ओके प्लीज या सिनेमात एका गाण्यात ‘सोलो’ डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं. मात्र नानाला माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले होते, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री झूम टीव्हीच्या मुलाखतीत म्हणाली होती.
या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही तनुश्रीने आरोप केले होते. तनुश्री राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती, ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात, असं ती म्हणाली होती.
नानाने वेळोवेळी आरोप फेटाळले
नानाने नेहमीच तनुश्रीच्या आरोपांना फेटाळून लावलं. जे खोटं आहे ते खोटंच आहे, असं म्हणत नानाने तनुश्रीचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता नाना पाटेकरांनी महिला आयोगालाही लेखी उत्तर देत तनुश्रीच्या आरोपांत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
तनुश्री वादात कलाटणी
तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादात वेळोवेळी कलाटणी मिळत गेली. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर, अनेकांनी या वादात उडी घेतली. यापैकी कुणी तनुश्रीची पाठराखण केली होती, तर कुणी नाना पाटेकर यांना पाठींबा दिला होता. नानाची बाजू घेणाऱ्यांमध्ये इंडस्ट्रीची ड्रामा क्विन राखी सावंत सगळ्यात पहिली होती. नानाची बाजू घेताना राखीने तनुश्रीवरच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर त्या दिवशी तनुश्री आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्जच्या नशेत बेशुद्ध होऊन पडली होती, असा दावा राखीने केला होता.
या दाव्यानंतर तनुश्रीनेही राखीवर पलटवार करत थेट तिला नोटीस पाठवली होती. तसेच जर सात दिवसात राखीने लेखी माफी मागितली नाही, तर राखीविरोधात 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असं तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी म्हटलं होतं.