चेन्नई/मुंबई : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping India Visit 2019) दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात तामिळनाडूतील महाबलिश्वरमला त्यांची दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा होणार आहे. या चर्चेतून भारत आणि चीन या दोन्ही शेजारी देशातील विविध प्रश्नांवर चर्चा होईल. दहशतवाद, शेजारी देश, व्यापारी संबंध अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये (Xi Jinping India Visit 2019) चर्चा होणं अपेक्षित आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं शुक्रवारी दुपारी चेन्नईला आगमन होईल. ते काही वेळ हॉटेल आयटीसी ग्रँड चोलाच्या राज राजा प्रेसिडेन्शियल सुटमध्ये थांबतील आणि थेट महाबलिपूरमकडे निघतील. तिथल्या अर्जून तपस्या स्थळ, पाच रथ स्थान आणि किनाऱ्यावरील मंदिराला भेट देतील. शुक्रवारी संध्याकाळी दोन्ही नेते सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटतील. चीनचे राष्ट्राध्यक्ष रात्रीचा मुक्काम चेन्नईच्या हॉटेल आयटीसी ग्रँड चोलामध्येच करतील. भारत दौऱ्यात ते चीनची लिमोझीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होंगशी या चिनी बनावटीच्या आलिशान कारचा वापर करणार आहेत.
शनिवारी सकाळी जिनपिंग पुन्हा महाबलिपूरमला जातील. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची चर्चा होईल. दुपारचं भोजन दोघेही एकत्रच घेतील. त्यानंतर जिनपिंग चेन्नईला जातील. त्याच दुपारी अडीचच्या दरम्यान ते मायदेशी परततील.
24 तासांच्या भारतातील मुक्कामात जिनपिंग यांची मोदींशी होणारी चर्चा ही दहशतवाद, भारत-चीन व्यापारी संबंध, बांगलादेश, चीन, भारत, म्यानमार कॉरिडॉरबद्दलही असू शकेल. एक मुद्दा भारताने कलम 370 हटवल्यानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही परिणाम होणार का? याबद्दलचाही असू शकेल.
या भेटीत कोणतेही करार होण्याची शक्यता नाही. या भेटीआधी अचानक चीनने काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या सुरात सूर मिळवताच भारतानेही अरूणाचल प्रदेशात लष्करी प्रात्यक्षिकं केली. त्यामुळे या वातावरणात दोन देशांच्या संबंधात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम भेटीदरम्यान जाणवेल की दोन्ही नेते त्यांच्या कौशल्याने पुढचं पाऊल उचलू शकतील या औत्सुक्यातून जगाचं लक्ष या भेटीकडे लागलेलं आहे.