लखनौ : उत्तर प्रदेशात योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सांभाळणाऱ्या कमल राणी वरुण यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. (Yogi Adityanath Government Cabinet Minister Kamal Rani Varun Dies of COVID19)
62 वर्षीय कमल राणी वरुण या उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर लखनौमधील ‘एसजीपीजीआय’ येथे उपचार सुरु होते. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यही कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे.
भाजपने 2017 मध्ये कमल राणी यांना कानपूरमधील घाटमापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघातून विजयी झालेल्या त्या भाजपच्या पहिल्याच उमेदवार ठरल्या होत्या. 2019 मध्ये त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
कमल राणी वरुण यांनी 1989 मध्ये कानपूर महानगर परिषद सदस्यत्व मिळवत राजकीय प्रवास सुरु केला. 1996 पासून सलग दोन वेळा त्यांनी खासदारकीही भूषवली होती.
हेही वाचा : कोरोना वॉरियर पोरका झाला! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक
कमल राणी यांचा विवाह 1975 मध्ये किशन लाल वरुण यांच्याशी झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कमल राणी वरुण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “उत्तर प्रदेश सरकारमधील माझ्या सहकारी, कॅबिनेट मंत्री श्रीमती कमल राणी वरुण यांच्या अकाली निधनाची बातमी क्लेशदायक आहे. राज्याने एक निष्ठावान नेता गमावला. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्या लोकप्रिय नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. कॅबिनेटचा भाग असताना त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने निर्णय घेतले” अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या. योगींनी आपला अयोध्या दौराही रद्द केला.
उत्तर प्रदेश सरकार में मेरी सहयोगी, कैबिनेट मंत्री श्रीमती कमल रानी वरुण जी के असमय निधन की सूचना, व्यथित करने वाली है।
प्रदेश ने आज एक समर्पित जननेत्री को खो दिया।
उनके परिजनों के प्रति मेरी संवेदनाएं।
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान प्रदान करें।
ॐ शांति!
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 2, 2020