परभणी: उंटाने चावा घेतल्याने 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. समीर शाहबुद्दीन असं या तरुणाचं नाव आहे. उंटाने गळ्याचा चावा घेतल्याने तो जखमी झाला होता, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. याप्रकरणी पोलिसांनी उंटासह मालकाला ताब्यात घेतलं आहे.
काय आहे प्रकरण?
परभणीत सध्या सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्गाची उर्स यात्रा सुरु आहे. या यात्रेचा एक भाग म्हणून भक्तांकडून दर्ग्यापर्यंत संदल काढली जाते. यंदा शेख समद शेख गफूर यांनी संदल आयोजित केला होता. या संदलमध्ये घोडे, उंट यांचा समावेश असतो.
हा संदल जनता मार्केटजवळ पोहोचला, तेव्हा समीरने उंटाची दोरी खेचल्याचं सांगण्या येतंय. दोरी खेचल्याने उंट बिथरला आणि त्याने समीरच्या गळ्याचा चावा घेतला.
या प्रकाराने उपस्थित भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. उंटाने जबर चावा घेतल्याने समीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान 16 वर्षीय समीरचा मृत्यू झाला.
या मृत्यूमुळे यात्रेवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी उंट मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.