पुणे : मोबाईल गेमच्या नादात एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे शुक्रवारी (19 जुलै) सकाळी ही घटना उघडकीस आली. दिवाकर उर्फ संतोष धनराज माळी, असं या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. संतोष हा वाघोली येथील महाविद्यालयात वाणिज्य पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.
संतोषला मोबाईलवर गेम खेळायचं वेड होतं. तो रात्र-रात्रभर मोबाईलवर गेम खेळत राहायचा. त्या नादात तो दोन दिवसांपासून कॉलेजलाही जात नव्हता. संतोषला मोबाईलच्या आहारी गेलेलं पाहून त्याची आजी त्याला याविषयी नेहमी रागवायची. मात्र, संतोष त्याकडे दुर्लक्ष करायचा. संतोष हा आई-वडील आणि आजीसोबत राहायचा. गुरुवारी (18 जुलै) आजी गावी गेली होती. त्यामुळे संतोष रात्री खोलीत एकटाच होता. त्यावेळी त्याने मोबाईलवर गेम खेळून झाल्यानंतर आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आत्महत्येची नोंद करुन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी संतोषचा मोबाईल जप्त केला असून नेमका तो कुठला गेम खेळायचा, ज्यामुळे त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं याचा तपास पोलीस करत आहेत.
आत्महत्येपूर्वी संतोषने एक चिठ्ठी लिहून ठेवली. यामध्ये “अवर सन विल शाईन अगेन”, “पिंजऱ्यातील ब्लॅक पँथर मुक्त झाला”, “आता कुठल्याच बंधनात राहिला नाही” आणि “द एंड”, असा मजकूर लिहिलेला आढळला. संतोषच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि त्याच्या मोबाईलवरही ‘ब्लॅक पँथर’ या मोबाईल गेममधील कॅरेक्टरचा फोटो लावलेला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, मोबाईलच्या आहारी गेल्याने माळी कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे.