नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा धोका पाहता देशभरात याआधी दोन टप्प्यांमध्ये साधारण 40 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला. याची मुदत 3 मे रोजी संपणार होती. मात्र, त्याआधीच आज (1 मे) गृह मंत्रालयाने आणखी 2 आठवड्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. आता 17 मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. या काळात विशिष्ठ झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या झोनमध्ये काय सुरु राहणार आणि काय बंद यांचाच घेतलेला हा आढावा (Zone wise Permissions and restriction in Lockdown).
रेल्वे-मेट्रो-विमान सेवा बंद
गृह मंत्रालयने 17 मेपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये रेल्वे, मेट्रो आणि विमान सेवा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था देखील बंदच राहणार आहेत. हॉटल आणि रेस्टॉरन् उघडायला देखील परवानगी नसणार आहे. धार्मिक स्थळं देखील बंद असतील. मॉल, जिम आणि सिनेमा हॉल देखील बंद राहतील. या गोष्टी रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन अशा तिन्ही झोनमध्ये बंद राहतील.
कन्टेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत नाही
रेड झोनमध्ये जे भाग कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत तेथे कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही. तेथील स्थानिक अधिकाऱ्यांना येथील नागरिक आरोग्य सेतू अॅप वापरतात की नाही याची खात्री करण्यास सांगितले आहे. या अॅपच्या माध्यमातून सर्वांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. या ठिकाणी वैद्यकीय वाहतूक वगळता कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला परवानगी नसेल.
सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक आणि अन्य प्रकारच्या सर्व सभांना बंदी असेल. अगदी विशेष परिस्थितीतच गृह मंत्रालयाच्या परवानगीने विमान, रेल्वे आणि रोडवरुन वाहतूक करता येईल. सर्वांना सायंकाळी 7 ते सकाळी 7 यावेळेत जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामांवर बंदी असेल.
लहान मुलं आणि वयोवृद्धांना बाहेर येण्यास बंदी
तिन्ही झोनमध्ये 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धांना, प्रकृती खराब असलेल्या लोकांना, गर्भवती महिलांना आणि 10 वर्षांहून कमी वय असणाऱ्या लहान मुलांना बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये दवाखाने आणि मेडिकल शॉप सुरु राहतील. मात्र येथे येताना शारिरीक अंतर ठेवण्यासह इतर खबरदारीचे सर्व नियम पाळणे आवश्यक असेल. कन्टेनमेंट झोनमध्ये मात्र यापैकी कशालाही परवानगी नसेल.
दारु विक्रीला परवानगी
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन, ऑरेन्ज आणि रेड अशा तिन्ही झोनमध्ये दारु विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच पान मसाला, गुटखा आणि तम्बाखू विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी कन्टेनमेंट झोनमध्ये दारु विक्रीवर बंदी असेल. नोंदणीकृत दुकानांनाच दारु विक्रीची परवानगी आहे. मात्र, मॉल्स आणि मार्केटिंग कॉम्प्लेक्समध्ये दारु विक्रीवर निर्बंध कायम आहेत. दारु, पान मसाला, गुटखा आणि तम्बाखू या पदार्थांचं सार्वजनिक ठिकाणांवर सेवन करण्यास बंदी आहे.
सलून बंद
रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सी, कॅब, आंतरजिल्हा वाहतूक, सलून, स्पा देखील बंद असणार आहेत. रेड झोनमध्ये काही अटी शर्तींसह काही गोष्टी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक स्थितीत चारचाकी वाहनांमध्ये चालक सोडून 2 व्यक्तींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. दुचाकीबाबत चालक सोडून कुणालाही गाडीवर प्रवास करता येणार नाही. रेड झोनमधील विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेज) उद्योगांना काही अटींसह काम सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
काही भागात ऑनलाइन पुरवठा सुरु
शहरांमध्ये आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकांनाना, मॉल, बाजार आणि कॉम्पेक्स सुरु करण्यास परवानगी नाही. रहिवाशी भागात काही छोटी दुकानं सुरु करण्यास परवानगी असेल. रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या ऑनलाइन पुरवण्याला परवानगी दिली आहे. खासगी क्षेत्रातील कार्यालयांना 33 टक्के लोकांना काम करता येणार आहे. उर्वरित कामगांरांना घरुनच काम करावं लागणार आहे.
रेड झोनमध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, आईटी आणि आईटी संबंधित इतर सेवा, डेटा आणि कॉल सेंटर, कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाउसिंग सेवा, खासगी सुरक्षा आणि सुविधा पुरवण्याला परवानगी देण्यात आली आहे.
ग्रीन झोनमध्ये बसेस चालवण्याला परवानगी
ऑरेन्ज झोनमध्ये टॅक्सी आणि कॅब अॅग्रीगेटर्सला 1 ड्रायव्हर आणि एक प्रवाशासह प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. चारचाकी वाहनांमध्ये जास्तीत जास्त 2 प्रवासी आणि दुचाकीवर एक प्रवाशाला परवानगी असेल. विशेष म्हणजे ग्रीन झोनमध्ये अगदी निवडक गोष्टी वगळता सर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये क्षमतेपेक्षा 50 टक्के प्रवाशांसह वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. कार्यालयांमध्ये देखील 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकणार आहेत.
Zone wise Permissions and restriction in Lockdown