रोज सकाळी या गोष्टी करा… शरीरच नव्हे तर मन आणि त्वचाही सुंदर होईल

| Updated on: Jan 13, 2025 | 8:55 AM

सकाळची सुरुवात आरोग्यदायी सवयींनी करून आपण त्वचेचे आणि शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतो. सुक्या मेव्यांचे सेवन, डार्क चॉकलेट, व्यायाम, भरपूर पाणी पिणे आणि पोषणयुक्त नाश्ता हे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. लवकर उठणे आणि शरीराला हायड्रेट ठेवणे हेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

रोज सकाळी या गोष्टी करा... शरीरच नव्हे तर मन आणि त्वचाही सुंदर होईल
Glowing Skin
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रत्येकाला उत्तम आरोग्य हवे असते. कोणताही आजार नको असतो. फुल एनर्जीही हवी असते. शरीराला निरोगी ठेवण्याबरोबरच केस आणि त्वचाही निरोगी ठेवणं आवश्यक आहे. आपल्या प्रत्येकासाठी सकाळचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. जर सकाळी आपली सुरुवात चांगली झाली तर आपले शरीर आणि मन चांगले राहते. त्याशिवाय अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण सकाळी केल्या तर आपली त्वचा अत्यंत चांगली राहते. खाली दिलेल्या काही टिप्स अंमलात आणल्या तर तुमची त्वचा नक्कीच चांगली राहील.

ड्राय फ्रूट्स :

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्स खाणं कधीही चांगलं. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण हा प्रयोग रोज केला पाहिजे. रोज उपाशी पोटी सुकामेवा खाल्ला तर त्वचाही सुंदर होते. रोज सकाळी बदाम, अल्मंड, खजूर खाणे फायदेशीर ठरते. याशिवाय, सकाळी तुम्ही गूळ किंवा गूळ आणि गहू यासारखे पदार्थही खाऊ शकता.

डार्क चॉकलेट :

डार्क चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. डार्क चॉकलेट खाण्यानेही त्वचा सुंदर होण्यास मदत होते. दररोज सकाळी 1 किंवा 2 तुकडे डार्क चॉकलेट खाल्याने त्वचा चांगली राहते. तुम्ही कॉफीसोबत डार्क चॉकलेट खाऊ शकता. यातील फ्लॅव्होनॉइड्स त्वचेला सुंदर ठेवण्यात मदत करतात.

व्यायाम :

रोज व्यायाम करणं हे कोणत्याही वयात चांगलं. शरीर आणि त्वचा सुंदर ठेवण्यासाठी तर रोज व्यायाम कराच. त्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. म्हणूनच, तुम्ही दररोज थोडा वेळ व्यायामाला देऊन चांगले परिणाम मिळवू शकता.

लवकर उठा :

सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले असते. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्याने शरीराला खूप फायदे होतात. यामुळे शरीर चांगले राहते आणि तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकता. सकाळी लवकर उठल्याने ताजतवानं वाटतं.

हायड्रेट :

निरोगी राहण्यासाठी हायड्रेटेड राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच, दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी ऐवजी पाण्याच्या ग्लासने करा. उठल्यानंतर आपल्या शरीराला हायड्रेट करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनशक्ती चांगली राहते. त्यामुळे रोज रिकाम्यापोटी किमान एक ग्लास पाणी तरी प्या.

नाश्ता :

सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. म्हणूनच, सकाळी उठल्यानंतर चांगला नाश्ता करावा. भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि प्रोटिनचा नाश्त्यात समावेश असावा. साखरेचे पदार्थ टाळा, कारण साखरेचा आपल्या शरीरावर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे साखर कमी करून खाण्याची सुरुवात करा.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)