सर्दी पडसे झाल्याने अनेकजण आपल्याला शिंकताना दिसतात. हिवाळ्यात तर वारंवार शिंका येतात. शिंकेचा संबंध जसा आरोग्याशी आहेत. तसाच तो आपल्या व्यक्तिमत्त्वाशीही आहे. ब्रिटनचे प्रसिद्ध बॉडी लैंग्वेज एक्सपर्ट रॉबिन केरमोड यांनी त्यांच्या पुस्तकात शिंकण्याच्या विविध प्रकारांच्या आधारे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सांगितले आहेत. तुम्ही कशा प्रकारे शिंकता? तुमचा स्वभाव कसा आहे? हे आपण आता पाहणार आहोत. बघा तुमचा स्वभाव खरंच शिंकेसारखाच आहे का?
काही लोकांना शिंकताना जोरात आवाज काढून शिंकण्याची सवय असते. तुम्हालाही जोरात आवाज काढून शिंकायची सवय असेल तर तुम्हाला लोकांना तुमच्याकडे आकर्षित करायला आवडते असा त्याचा अर्थ होतो. आपल्याकडे लोकांनी बघावं अशी सुप्त इच्छा तुमची असते. तसेच आपल्या कल्पनांकडे लोकांना आकर्षित करायलाही तुम्हाला आवडते.
तुम्हाला शिंकण्यापूर्वी किंवा नंतर ‘सॉरी’ किंवा ‘एक्सक्यूज मी’ म्हणायची सवय असेल तर तुमचा स्वभाव शांत, सभ्य आणि अंतर्मुख आहे, असा त्याचा अर्थ होतो. अशा व्यक्तींना इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला आवडत नाही.
तुम्ही वारंवार शिंकत असाल तर याचा अर्थ तुम्ही लोकांचं लक्ष सतत तुमच्याकडे वेधू इच्छिता. कदाचित लोकं आपली दखल घेत नाही किंवा दुर्लक्ष करतात असं तुम्हाला वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो. म्हणूनच तुम्ही लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करता.
काही लोकांना शिंक आल्यावर ते शिंक थांबवण्याचा प्रयत्न करतात. असं करणारे लोक हे अंतर्मुख स्वभावाचे असतात. त्यांना गर्दीपासून दूर राहून स्वत:ची जागा निर्माण करायला आवडते. इतरांपासून वेगळं राहायला यांना आडतं. हे लोक आपल्याच दुनियेत मग्न असतात.
जे लोक शिंकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा हाताने झाकतात, ते लोक इतरांच्या आनंदाची काळजी घेतात. हे लोक नियम आणि कायद्यांच्या चौकटीत राहून आपले सर्व कार्य करत असतात. असे लोक स्वभावाने खूप माणुसकी असलेले आणि मनमिळावू असतात.