नवी दिल्ली – चांगलं आरोग्य व तब्येत हवी असेल तर आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा (fruits and vegetables) समावेश करणं गरजेचं आहे. हिरव्या भाज्यांमधून अनेक प्रकारची पोषक तत्त्वं (nutrition) शरीराला मिळतात आणि त्यांच्यामधील तंतुमय घटकांमुळे पचनक्रियाही (digestion) चांगली राहते. मात्र या हिरव्या भाज्यांचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्याचा लाभ आपल्याला नीट मिळू शकेल. भाजी चिरण्यापासून ते ती शिजवण्यापर्यंत, प्रत्येक क्रियेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कोणतीही भाजी स्वच्छ धुतल्याशिवाय चिरू नये.
आहारतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आपल्या (भारतीय) जेवणात पोळी, भाजी, आमटी, भात, सॅलॅड आणि कोशिंबीर अशा पदार्थांचा समावेश असतो, जो एक सर्वोत्तम व परिपूर्ण आहार आहे. भारतीय जेवणाचे ताट यासाठीच उत्तम मानले जाते, कारण त्यातील प्रत्येक पदार्थांमध्ये काही ना काही गुण असतातंच. मात्र कोणत्या पदार्थाचा अथवा घटकाचा कसा उपयोग करावा हे समजून घेणेही तितकेच महत्वाचे ठरते. बऱ्याच वेळेस आपण जेवण चविष्ट बनवण्याच्या नादात एखादा पदार्थ इतका वेळ शिजवतो, की त्यातील पोषक तत्वंच नष्ट होतात. त्यामुळे आपण जे खातो, त्याच्या पोषणाबद्दलही माहिती असणे महत्वाचे ठरते, असे आहार तज्ज्ञांनी सांगितले.
भाज्या व फळं सालांसकट खावीत
साधारणपणे प्रत्येक ऋतूमानानुसार विशिष्ट भाज्या मिळतात, त्या सर्वांचे सेवन करावे. शक्यतोवर भाज्या आणि फळे सालांसकट खाव्यात, त्यातील फायबर बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करते. मात्र, आजकाल भाज्या व फळांवर अनेक कीटकनाशकांची फवारणी केली जाते, त्यामुळे भाजी अथवा फळं खाण्यापूर्वी किंवा ती चिरण्यापूर्वी गरम पाण्यात पाच मिनिटे बुडवून ठेवावे व स्वच्छ धुवावे. पण भाज्या कधीही चिरल्यानंतर धुवू नयेत, अन्यथा त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात. विशेषतः हिवाळ्यात मिळणाऱ्या पालक, मोहरी, राजगिरा, बथुआ, सोया, मेथी, गाजर, मुळा अशा भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि मगच चिराव्यात. भाज्या चिरल्यानंतर धुतल्यास त्यातील घटक पाण्यातून निघून जातात. तसेच हिरव्या भाज्या जास्त वेळ शिजवू नयेत, कारण यामुळेही त्यामधील पोषक तत्वांचा नाश होतो.