नवी दिल्ली : चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम आपले ओठ (lips) करतात. आपले ओठ खूप नाजूक असतात. त्यामुळेच त्यांच्यावर कोणत्याही गोष्टींचा वापर करताना तो जपून केला पाहिजे. ओठ सुंदर दिसावेत यासाठी ते हायड्रेटेड असणंही खूप महत्वाचं ठरत. तसंच वेळोवेळी ओठांची योग्यरितीने काळजी घेणेही (lip care) खूप महत्वाचे ठरते. ओठांसाठी कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यापूर्वी ती नीट तपासून घ्यावी, कोणतीही गोष्ट सहज ओठांवर वापरू नये, अन्यथा ते फुटू शकतात, काळवंडू (dry and black lips) शकतात. त्यांचे नुकसानही होऊ शकते. आपल्या ओठांसाठी कोणत्या गोष्टी हानिकारक ठरतात, व कोणते पदार्थ वापरू नयेत, ते जाणून घ्या.
लिपस्टिक
आपले ओठ खूप नाजूक असतात, त्यामुळेच त्यांची योग्य पद्धतीने अधिक काळजी घेणे गरजेचे असते. तसेच हवामानाचा प्रभावही ओठांवर पडतो. सध्या अनेक महिला, तरूणी व काही वेलेस तर लहान मुलीही लिपस्टीकचा सर्रास वापर करतात, लिपस्टिकची क्रेझ वाढली आहे. लिपस्टिक लावल्याने चेहरा सुंदर दिसतो. तसेच आपला लूकही सुधारतो. मात्र असे असले तरीही ओठांवर अशीच कोणतीही लिपस्टिक वापरू नये. त्यासाठी केवळ ब्रांडेड लिपस्टीकचाच वापर करावा. कारण त्या तुमच्या ओठांसाठी कमी हानिकारक असतात. तुम्हीही बाजारातून स्वस्तात एखादी लिपस्टिक विकत घेत असाल तर तसे करणे थांबवा. यामुळे तुमचे ओठ काळे होऊ शकतात. कधीकधी संसर्ग देखील होऊ शकतो. अशी लिपस्टिक विकत घ्या व वापर करा, ज्यामुळे तुमचे ओठ मॉयश्चराइज राहतील.
या पदार्थांपासून रहा दूर
ओठांची काळजी घेणारी म्हणजेच लिप केअर उत्पादने ही अनेक प्रकारच्या गोष्टींचे मिश्रण करून तयार केली जातात. म्हणूनच त्यात कोणते घटक आहेत, हे नीट तपासून घेतले पाहिजे. पॅराबेन्स असलेली उत्पादने खरेदी करू नका. तसेच, फिनॉल, मेन्थॉल आणि सॅलिसिलिक ॲसिडपासून बनविलेले पदार्थ ओठांना अधिक कोरडे करतात. याशिवाय लिप बाम किंवा व्हॅसलीन ज्यामध्ये सुगंध असतो ते देखील ओठांना हानी पोहोचवू शकतात. अल्कोहोलवर आधारित उत्पादने लावूनही त्वचा कोरडी होते. त्यामुळे ओठांसाठी अशा पदार्थांचा वापर करणे टाळावे.
लो क्वॉलिटी प्रॉडक्ट्स वापरणे टाळा
कोणत्याही गोष्टीची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. म्हणूनच ब्रँडची चर्चा होते. जेव्हा त्वचेचा प्रश्न येतो तेव्हा आपण अजिबात तडजोड करू नये. खराब उत्पादनांमुळे तुमच्या ओठांवर पुरळ उठू शकते. ओठांचा ओलावा नाहीसा होऊ लागतो. लिप बाम असो किंवा स्क्रब, ते फक्त चांगल्या दर्जाचेच खरेदी करावे.
या गोष्टींची घ्या विशेष काळजी
– ओठांना वारंवार स्पर्श करू नये. कारण बऱ्याच वेळेस आपले हात स्वच्छ धुतलेले नसतात, त्यावर घाण असू शकते. तेच हात ओठांना लावल्यास ओठ घाण होऊ शकतात, तसेच त्यावर पिंपल्सही येऊ शकतात.
– धूम्रपान करणे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या ओठांसाठीही अत्यंत हानिकारक असू शकते. धूम्रपानामुळे तुम्ही अकाली म्हातारे दिसाल तसेच तुमचे ओठही काळे होतील.
– तुम्हीसुद्धा ओठांवरून वारंवार जीभ फिरवता का ? हो असे उत्तर असेल तर ही सवय लगेच सोडा, कारण त्यामुळे ओठ कोरडे होऊ लागतात.