नैसर्गिक पध्दतीने तयार करण्यात आलेली मेंदी (henna) केसांसाठी अत्यंत गुणकारी असते. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठीदेखील मेंदीचा चांगला वापर केला जात असतो. पूर्वी ज्यावेळी हेअर कलर (Hair color) आदी पर्याय नव्हते तेव्हा पांढर्या केसांना रंग देण्यासाठी मेंदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मेंदीमुळे केसांना केवळ रंगच नाही तर अनेक फायदे होतात. केसांची वाढ होते, केसांना चमक मिळते, केस मुलायम होतात, असे अनेक फायदे केसांना होत असतात. आता केसांसाठी विविध कृत्रिम प्रोडक्ट (Artificial product) उपलब्ध असतानाही मेंदीने आपली जागा अजूनही कायम ठेवली आहे. अजूनही हेअर कलर ऐवजी लोक केसांना मेंदी लावण्यास प्राधान्य देत असतात. परंतु मेंदी लावत असताना अनेकदा एक चूक केली जाते. अनेकांच्या मते मेंदी जास्त काळ केसांना लावून ठेवल्यास यातून जास्त फायदा होईल, त्यामुळे अनेक लोक रात्रभर मेंदी लावून ठेवतात. परंतु जास्त काळ मेंदी लावून ठेवल्यास यातून केसांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते.
चमक होते नष्ट
अनेक लोक तीन तासांहून अधिक काळासाठी केसांना मेंदी लावत असतात. परंतु याने केसांचे मोठे नुकसान होत असते. तज्ज्ञांच्या मते केसांना जास्त काळ मेंदी लावून ठेवल्यास केसांची चमक नाहिशी होत असते. मेंदी जास्त काळ केसांवर ठेवल्यास केस कोरडे होउन त्यांची वाढ खुंटण्याचा धोका असतो. अनेक लोक रात्री मेंदी लावून झोपी जातात, सकाळी अंघोळीच्या वेळीच ते मेंदी धूत असतात. परंतु असे करणे योग्य नाही. अशाने केसांची मोठी हानी होत असते.
ओलावा कमी होतो
केसांना जास्त काळ मेंदी लावल्यास केस हळूहळू ड्राय म्हणजेच कोरडे होत असतात. केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो. त्यामुळे केस गळू लागतात. तसेच अनेक जण मेंदी इतर रासायनिक गुणधर्म असलेल्या घटकांमध्ये मिसळून डोक्याला लावत असतात. परंतु यातून केसांची मोठी हानी होत असते. त्याऐवजी साध्या पाण्यात मेंदी भिजवून ती डोक्याला लावल्यास केसांचे पोषण होण्यास मदत होत असते.
केसांच्या रंगात बदल
अनेक जण डोक शांत ठेवण्यासाठी मेंदीचा वापर करीत असतात. परंतु यातून तुमच्या केसांचा रंग बदलू शकतो. मेंदीचा वापर केवळ केसांना नैसर्गिक पध्दतीने रंग देणे, तळ हातांवर मेंदी काढण्यासाठी केला जात असतो. अशात जर डोक्याला विनाकारण मेंदी लावल्यास यातून केंसाच्या रंगात बदल होण्याची शक्यता असते.