मुंबई : प्रत्येक वर्षी असा एक दिवस येतो जेव्हा आपण आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना फसवतो आणि त्यांची मजा घेतो. हा दिवस म्हणजे एप्रिल फूल डे. 1 एप्रिल रोजी हा एप्रिल फूल डे जगभरात साजरा केला जातो.
पूर्वी हा दिवस फ्रान्ससह काही युरोपियन देशांमध्येच साजरा केला जात असे. पण हळूहळू हा एप्रिल फूल डे जगभर साजरा केला जाऊ लागला. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जगात असे काही देश आहेत जिथे एप्रिल फूल डे सेलिब्रेट करण्याची स्वतःची एक प्रथा आहे. पण या देशांबद्दल जाणून घेण्यापूर्वी, सगळ्यात आधी आम्ही तुम्हाला एप्रिल फूल डेचा इतिहास सांगणार आहोत.
1381 साली एप्रिल फूल हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली असे म्हणतात. त्या काळी, बोहेमियाचा राजा रिचर्ड आणि राणी ऍनी यांनी घोषित केले की 32 मार्च 1381 रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे. राजा आणि राणीच्या साखरपुड्याची बातमी ऐकून जनता आनंदी झाली होती. मात्र 31 मार्च रोजी लोकांना त्यांची फसवणूक झाल्याचं समजलं. त्यांना समजलं की मार्च महिन्यात 32 तारीखच नसते. तेव्हा लोकांना समजलं की राजा राणीने त्यांची मजा घेतली आहे. त्यानंतर, एप्रिल फूल डे 1 एप्रिल रोजी साजरा केला जाऊ लागला.
स्कॉटलंडमध्ये दोन दिवसांचा उत्सव
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्कॉटलंडमध्ये एप्रिल फूल डे हा दोन दिवस साजरा केला जातो. त्यामुळे त्याला हंटिंग द गाउक असे म्हटले जाते. जे लोक प्रँक करतात त्यांना गाउक असे म्हणतात. गाउक म्हणजे कोकिळा.
एप्रिल फूल डे या दिवशी कोरियाचे राजघराणे खोटे बोलू शकतात. तसेच हे घराणे लोकांसोबत खोड्या म्हणजेच प्रँकही करू शकते.