टॉयलेट फ्लश टॅंकवरील लहान बटणाचा उपयोग माहितीये का? होईल पाण्याची बचत
आजकाल बऱ्यापैकी सर्वांच्याच घरात वेस्टर्न टॉयलेट बसवलेलं असतं. त्याच्यावर एक फ्लश टॅंकही बसवलेला असतो. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल फ्लश टॅंकला दोन बटण असतात.
ड्युअल फ्लश बसवण्याचा ट्रेंड
यापैकी एक बटण दाबल्यानंतर म्हणजेच फ्लश केल्यानंतर पाणी येत. आजकाल ड्युअल फ्लश बसवण्याचा ट्रेंड आहे. तसं तर ड्युअल फ्लश हे सिंगल फ्लशच्या तुलनेत महाग असतं पण त्याचा उपयोग मात्र नक्कीच होतो.
ड्युअल फ्लशमधील दोन्ही बटण वेगळी असतात. तुम्हाला माहितीये का की या दोन बटणाचा वापर नेमका कशासाठी केला जातो ते. मुख्यता: दोघांपैकी लहान बटणाचा वापर कशासाठी केला जातो ते, जाणून घेऊयात .
फ्लश टॅंकवरील दोन्ही बटणांचा उपयोग काय?
टॉयलेट वापरताना फ्लश टॅंकवरील एक बटण हे आकाराने मोठं तर दुसरं बटण हे आकाराने लहान असतं. पाण्याची बचत करण्यासाठी आणि त्याचा अपव्यय टाळण्यासाठी शौचालयांमध्ये ड्युअल फ्लश बसवण्यास सुरुवात करण्यात आली.
तर टॉयलेटमध्ये लागलेले मोठे फ्लश हे केवळ टॉयलेटमधील मल बाहेर काढण्यासाठी वापरले जाते. फ्लश टॅंकला असलेले फ्लशचे मोठे बटण प्रेस केल्यावर सुमारे 6 ते 9 लिटर पाणी वापरले जाते. ज्यामुळे मल पूर्णपणे टॉयलेटमधून बाहेर पडते.
फ्लश टॅंकवरील लहान बटण म्हणजे पाण्याची बचत
फ्लश टॅंकला मोठ्या बटणासोबतच एक फ्लशचे लहान बटण देखील लावलेले असते. लघुशंका केल्यावर हे बटण वापरले जाऊ शकते. हे बटण एका वेळी सुमारे 3 ते 4 लिटर पाणी सोडते.
त्यामुळे नक्कीच पाण्याची बचत होते आणि टॉयलेट साफही होते. फ्लश टॅंकला असलेल्या लहान बटणाचा उपयोग माहित नसल्याने बरेचजण मोठ्या बटणाचा वापर करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते.
ड्युअल फ्लश सिस्टमची कल्पना कोणाची?
ड्युअल फ्लश सिस्टमची कल्पना अमेरिकन इंडस्ट्रियल डिझायनर विक्टर पेपानेक यांची होती. 1976 मध्ये आलेल्या त्यांच्या ‘डिझाइन फॉर द रिअल वर्ल्ड’ या पुस्तकातही त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ड्युअल फ्लशची निर्मिती जगात प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये 1980 साली झाली. त्यानंतर इतर देशांमध्ये देखील ड्युअल फ्लश बसवण्याचा ट्रेंड वाढला.
वर्षभरात तब्बल 20,000 लिटर पाण्याची बचत होऊ शकते
ड्युअल फ्लशचा विचारपूर्वक वापर केल्यास एखादी व्यक्ती वर्षभरात 20,000 लिटर पाण्याची बचत करू शकते. ड्युअल फ्लश हे सिंगल फ्लशच्या तुलनेत महाग असले तरी पर्यावरणास अनुकूल असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते.