एक्सपायर झालेले चिकन खाण्याचे आरोग्यावर काय होतात परिणाम ?

| Updated on: Dec 23, 2024 | 3:05 PM

तेलंगणाच्या अन्न व सुरक्षा विभागाने अनेक रेस्टॉरंटमधून एक्सपायर झालेले कच्चे चिकन जप्त केले आहे. अशावेळी एक्सपायर चिकन खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेणं गरजेचं आहे. याचबरोबर चिकन किती काळ आत ठेवावे? हे सगळं जाणून घेऊयात.

एक्सपायर झालेले चिकन खाण्याचे आरोग्यावर काय होतात परिणाम ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us on

आपण अनेकदा बाहेर जेवण करण्याचा प्लॅन करत असतो. तर कधी घरातील एखाद्या सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा प्लॅन करतो. कारण आपल्याला माहित असते की रेस्टॉरंटमध्ये फूड एक्सपायरी किंवा स्वच्छतेशी संबंधित कोणतीही समस्या आढळत नाही. त्यामुळे आपण सगळे मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेत असतो. पण नुकतेच समोर आलेल्या प्रकरणाबद्दल जाणून तुम्हीही डोकं धरून बसाल. कारण तेलंगणातील सिकंदराबादमधील रेस्टॉरंटमधून 10 किलो एक्सपायर झालेले कच्चे चिकन आणि लेबल नसलेले नूडल्स सापडले आहेत.

एक्सपायर झालेलं अन्न आरोग्यासाठी धोकादायक असते. हे सर्वांच माहित आहे. तसेच आपण कोणतेही पदार्थ बाजारातून विकत घेतो तेव्हा एक्सपायरी तारीख बघूनच वस्तू घेत असतो. त्यात आपल्या भारतात बहुतांश लोकांना चिकन खायला आवडतं. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 (2019-21) च्या अहवालानुसार 57.3 टक्के पुरुष आणि 45.1 टक्के स्त्रिया आठवडाभर चिकन किंवा इतर मांसाहारी पदार्थ खातात. अशावेळी चिकन खाणाऱ्यांनी एक्सपायर झालेले चिकन खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेणं गरजेचं आहे. पण सर्वप्रथम जाणून घेऊया चिकन किती काळ साठवून ठेवता येईल.

चिकन किती काळ ताजे राहू शकते?

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, कच्चे चिकन सुमारे 1-2 दिवस फ्रीजमध्ये ठेवले जाऊ शकते. तसेच, शिजवलेले चिकन सुमारे 3 ते 4 दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. चिकन फ्रिजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरियाची वाढ मंदावते. अश्या तऱ्हेने चिकन ताजे आहे कि नाही ओळखू शकता आणि त्याचे सेवन योग्य पद्धतीने करू शकता.

खराब चिकनबद्दल जाणून घ्या

इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. पंकज वर्मा सांगतात की, चिकन खराब झालं तर त्याच्या रंगात बदल दिसेल. तसेच चिकनचा गंध, टेक्सचर आणि चवीतही फरक पडेल. जर तुम्ही आणलेले चिकन २ ते ३ दिवस तसेच राहिल्यानंतर त्यात असं काही दिसल्यास समजून घ्या की चिकन खराब झालं आहे.

हे आजार होऊ शकतात का?

अन्न विषबाधा:  एक्सपायर चिकनमध्ये साल्मोनेला आणि लिस्टेरिया सारखे बॅक्टेरिया विकसित होतात. या जीवाणूंमुळे विषबाधा (फूड पॉइझनिंग) होऊ शकते. अशावेळी एक्सपायर चिकन खाल्ल्याने अतिसार, उलट्या, ताप, पोटदुखी आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम :  एक्सपायर झालेल्या चिकनमध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढत असतात. जेव्हा ह्या चिकनचे सेवन करता तेव्हा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.

किडनी आणि लिव्हरवर परिणाम : खराब झालेल्या चिकनचे सेवन केल्यास त्यात असलेले विषारी पदार्थ जेव्हा शरीरात जातात तेव्हा किडनी आणि लिव्हरवर दबाव येऊ शकतो. किडनी आणि लिव्हर हे विषारी पदार्थ फिल्टर करण्याचे काम करतात. अशावेळी खराब चिकनमुळे किडनी आणि लिव्हरचे गंभीर आजार होऊ शकतात.

या गोष्टीही लक्षात ठेवा

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या मते, कच्चे चिकन साठवून ठेवण्यापूर्वी आणि नंतर कमीतकमी 20 सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा. त्याचबरोबर कोमट पाणी आणि साबणाने वॉश सिंक लगेच स्वच्छ करा, जेणेकरून बॅक्टेरिया वाढणार नाहीत. तसेच शिजवलेले चिकन शिल्लक राहिल्यास ते १ ते २ तास फ्रीजमध्ये ठेवावे. अश्याने बॅक्टेरिया वाढत नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)