नवी दिल्ली : काही महिलांना लांब केस आवडतात तर काहींना लहान. केसांच्या लांबीबरोबरच प्रत्येकाच्या केसांचा पोतही (hair pattern) एकमेकांपेक्षा वेगळा असतो. केस कसे हाताळता याशिवाय ते कसे धुता व वाळवता, या पद्धतीही केसगळतीसाठी (hairfall) कारणीभूत ठरू शकतात. सकाळी उठल्यावर जर तुमच्या उशीवर तुटलेले केस दिसत असतील तर सावध व्हा. लांब केस सांभाळणे हे कठीण काम आहे यात काहीच शंका नाही. केस तुटणे आणि गळणे टाळण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. कधी केसांना तेल (oiling)लावून तर कधी वेणी घालून, कधी हेअर स्पा घेऊन आपण केसगळती रोखण्याचा प्रयत्न करत असतो.
कधी कधी गरम पाण्याने केस धुतल्यानेही केस गळतात. तसेच रिबॉन्डिंग, स्मूथनिंग आणि हेअर ब्लोअरचा जास्त वापर केल्याने केस पातळ आणि खडबडीत होतात. तुम्हाला केसगळतीचा त्रास सतावत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही टिप्स फॉलो करा.
1) केस स्कार्फमध्ये गुंडाळा
तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी केस मोकळे सोडण्याऐवजी मदतीने बांधून ठेवणे चांगले ठरते. मात्र ते खूप घट्ट न बांधता, थोडे सैल राहू द्या. त्यामुळे केस अडकून तुटण्याची भीती नसते. तुमचे केस तुटण्यापासून आणि गुंतागुतींपासून वाचवण्यासाठी रेशमी स्कार्फमध्ये गुंडाळून ठेवा व मग झोपा.
2) वेणी घाला
झोपण्यापूर्वी केस बांधण्याचा नियम काटेकोरपणे पाळा. तुमचे केस लांब आणि दाट असल्यास, वेणी घालून झोपावे. यामुळे केसांना इजा होत नाही. सकाळी उठल्यानंतर वेणी सडवून केस नीट विंचरावेत.
3) हेअर सीरमचा करा वापर
केसांना पोषण देण्यासाठी, विशेषत: प्रथिने देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सीरम बाजारात उपलब्ध आहेत. अशावेळी केसांना नियमितपणे हेअर सीरम लावा. यामुळे केस मजबूत होतात.
4) तेल लावून मालिश करून झोपावे
केस दुरुस्त करण्यासाठी तुम्ही जोजोबा तेल, ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल किंवा बदाम तेल वापरू शकता. हेअर मसाज केल्याने तुमचे केस तुटण्यापासून वाचतात आणि तुमच्या स्नायूंना ताजेपणा मिळतो. तेलामध्ये असलेले पोषण तुमच्या केसांपर्यंत पोहोचते आणि त्यांना फायदा होतो. लक्षात ठेवा की रात्री तेल लावल्यानंतर सकाळी केस शांपूने स्वच्छ धुवा. यामुळे स्कालप तेलकट रहात नाही.
5) उशीसाठी सॅटीनचा अभ्रा वापरा
काहीवेळा उशीचे कव्हर अथवा अभ्रा हा देखील केसांच्या नुकसानाचे कारण बनतात. काही अभ्र्यांवर असलेल्या भरतकामामुळे केस बाहेर येतात. अशा परिस्थितीत, केवळ कापूस किंवा सॅटिनपासून बनविलेले कव्हर्स वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे केस तुटणे आणि गळणे टाळता येते.
6) केस ओले ठेवून झोपू नका
रात्री केस धुतल्यानंतर झोपण्याची सवय असेल तर त्यामुळे केसांचे आयुष्य कमी होते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी केस धुवा, जेणेकरून ते कोरडे होतील. याशिवाय हिवाळ्यात तुम्ही ब्लोअरच्या मदतीने केस सुकवू शकता. मात्र, काही वेळा जास्त ब्लोअर वापरल्याने केस खराब होतात. त्यामुळे त्याचा कमीत कमी वापर करा. नैसर्गिक पद्धतीने केस वाळवा.