नवी दिल्ली : होळी हा रंगांचा सण देशभरात साजरा होतो. अवघ्या काही दिवसांवर आलेला हा सण साजरा करण्यासाठी लोकं जोरदार तयारी करत आहेत. होळी (Holi 2023) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हा सण ८ मार्च रोजी साजरा होणार आहे. अशावेळी सर्वजण या उत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत. पण अनेकदा सणासुदीच्या काळात लोक आपल्या आरोग्याकडे (neglect health) दुर्लक्ष करतात. रंग खेळताना लोकं खाण्यापिण्याच्या बाबतीत फार बेफिकीर असतात. अशा परिस्थितीत सतत गोड पदार्थ तसेच तळलेले अन्न खाल्ल्याने (food) आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पण जर तुम्हाला होळीच्या सणाच्या दिवशी निरोगी राहून सणाचा आनंद लुटायचा असेल तर या टिप्स फॉलो करा.
होळीच्या दिवसात अशी घ्या खाण्यापिण्याची काळजी
– जर तुम्ही होळीच्या उत्साहात भरपूर गोड पदार्थ, पुरणपोळी, गुजिया आणि मालपुआ खाल्लेत तर त्याबद्दल दोषी वाटून घेऊ नका. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही उत्सवात कितीही व्यस्त असलात तरी, सणाच्या काळात तुमच्या व्यायामाचे वेळापत्रक बिघडू देऊ नका. सणासुदीच्या धामधुमीतही वर्कआउटसाठी 20 मिनिटे तरी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.
– होळी हा सण फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो. या महिन्यात बदलत्या हवामानामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत, या सणासुदीच्या काळात तुम्ही स्वत:ला चांगले हायड्रेट ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणूनच जास्तीत जास्त पाणी वापरण्याचा प्रयत्न करा. यासोबतच नारळ पाणी किंवा वेगवेगळे ज्यूस पिणे हेदेखील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
– सणांचा हंगाम असेल आणि खाण्यापिण्याची रेलचेल नसेल तर सण अपूर्णच वाटतात. पण जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल आणि निरोगी रहायचे असेल तर या सणाच्या काळात बाहेरून मिठाई किंवा फराळ विकत घेण्याऐवजी घरीच हेल्दी आणि चविष्ट पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा.
– सणाच्या काळात खूप हेवी पदार्थ खाऊ नका, त्यांचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही खूप गोड, हेवी पदार्थ खाल्लेच असेल तर त्याची भरपाई करण्यासाठी नंतर तुम्ही भाज्यांचे सूप, फळांची-भाज्यांची कोशिंबीर किंवा शिजवलेल्या डाळींचे सेवन करू खाऊ शकता. यासोबतच दही किंवा ताक खाऊन तुम्ही तुमची पचनक्रिया चांगली ठेवू शकता.
– होळीच्या दिवशी लोक हा सण अनेकदा रंग आणि गुलालाने साजरा करतात. नंतर त्याच रंगलेल्या हातांनी अन्नपदार्थही खाल्ले जातात. मात्र त्यामुळे केमिकलयुक्त, शरीरासाठी विषारी असे रंग पोटात जाऊन विषबाधा होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा वेळी सणासुदीच्या दिवशी काहीही खाण्यापूर्वी न विसरता हात स्वच्छ धुवा.