Go First ची मान्सून स्पेशल ऑफर, अवघ्या 1499 रुपयांत करा विमानप्रवास !

| Updated on: Jul 09, 2022 | 6:01 PM

Go First फर्स्ट एअरलाइनने मान्सून स्पेशल ऑफर आणली असून 10 जुलैपर्यंत त्याचा लाभ घेतला जाऊ शकतो. या ऑफरनुसार तिकिटांची किंमत 1499 रुपयांपासून सुरू होत असून 26 जुलैपासून प्रवास करता येणार आहे.

Go First ची मान्सून स्पेशल ऑफर, अवघ्या 1499 रुपयांत करा विमानप्रवास !
Go First ची मान्सून स्पेशल ऑफर
Image Credit source: twitter
Follow us on

पावसाळा सुरु होताच अनेक कंपन्यांची मान्सून ऑफर सुरु होते. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्याकडून ऑफर्सचा पाऊस पडतो. गो फर्स्ट (Go First) या विमान कंपनीनेही मान्सून ऑफर (monsoon offer) आणली आहे. देशांतर्गत प्रवासासाठीच्या (Domestic Route) तिकीटाची किंमत अवघ्या 1499 रुपयांपासून सुरु होत आहे. 7 जुलै ते 10 जुलै या कालावधीत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या कालावधीदरम्यान बुकिंग करण्यात आलेल्या तिकीटावर 26 जुलै ते 31 मार्च 2023 या कालावधीत प्रवास करण्यात येणार आहे. ‘फर्स्ट कम फर्स्ट गेट’ म्हणजेच प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य, या तत्वावर या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. मात्र या ऑफर अंतर्गत बुक करण्यात आलेले तिकीट ट्रान्स्फरेबल नाही. तसेच या ऑफरचा लाभ इतर कोणत्याही ऑफरसोबत घेता येणार नाही.

गो फर्स्टच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आणि बुधवारी, एअरलाइनतर्फे प्रवाशांना स्पेशल ऑफर देण्यात येते. त्यानुसार, जर तुम्ही मंगळवारी आणि बुधवारी या विमान कंपनीतर्फे प्रवास केला तर तुम्हाला अनलिमिटेड री-शेड्यूलिंगचा फायदा मिळतो. तसेच मोफत जेवण आणि सीट सिलेक्शनची सुविधाही मिळते. कंपनीतर्फे कपल्ससाठी 1000 रुपयांचे फ्री फूड हॅम्पर आणि कुटुंबासाठी 2000 रुपयांचे फ्री फूड हॅम्पर मिळते. 25 सप्टेंबर 2022 पर्यंत या ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो. हा बुकिंग कालावधी असून प्रवासाचा कालावधी 28 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.

अवघ्या 2000 रुपयांत गोव्याचे तिकीट

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा प्रवासाचे तिकीट 2019 रुपयांपासून सुरू होते. तर दिल्ली ते श्रीनगरचे तिकीट 3641 रुपयांपासून आहे. त्याचप्रमाणे लेहला जाण्याच्या तिकीटाची किंमत 1894 तर चेन्नई व कलकत्ताहून पोर्ट ब्लेअरला जाण्यासाठी विमानाचे तिकीट 4425 रुपयांपासून आहे.

एअर एशियानेही आणला स्पेशल सेल

गो फर्स्ट विमान कंपनीप्रमाणेच एअर एशिया या कंपनीनेही मान्सून स्पेशल ऑफरची घोषणा केली आहे. एअर एशिया (Air Asia)तुमच्यासाठी बंपर ऑफर घेऊन आली आहे. एअर एशिया इंडियाने स्प्लॅश सेलची घोषणा केली असून त्या अंतर्गत देशांतर्गत प्रवास, उदा – दिल्ली- जयपूर प्रवासासाठी तिकीटाची किंमत 1479 रुपयांपासून सुरू होते. एअर एशियाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 10 जुलै 2022 पर्यंत करण्यात आलेल्या बुकिंगवर ही ऑफर लागू होईल. या कालावधीत बुक करण्यात आलेल्या तिकीटाचा 26 जुलै 2022 ते 31 मार्च 2023 या दरम्यान लाभ घेता येईल. मात्र ही ऑफर केवळ एअर एशियाच्या 15 उड्डाणांवर लागू असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच ही ऑफर लिमिटेड असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या तत्वानुसार लागू होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.