मुंबईः फळे आणि भाज्यांमधून शरीरासाठी जास्तीत जास्त पोषकतत्वे मिळतात. काही भाज्या आणि फळे सालीसह खाण्याचे अधिक फायदे होतात. तर काहींच्या बिया मुख्य भागापेक्षा आरोग्यदायी (Healthy) असल्याचे आढळून आले आहे. परंतू, आपल्याला या बियांबाबत फारशी माहिती नसल्याने, आपण त्या सहज फेकून देतो. भोपळा ही देखील अशीच एक भाजी आहे ज्याचे फायदे मुख्य भागापेक्षा त्याच्या बियांमध्ये जास्त असतात. भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds) विविध प्रकारच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. भोपळ्याच्या बिया अनेक प्रकारच्या पारंपारिक औषधांसाठी वापरल्या जातात. याच्या वापराचे फायदे घरगुती उपचारांमध्ये देखील महत्वाचे आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व (Nutrients) देखील असतात, ज्याची आपल्या शरीराला नियमित गरज असते आणि त्याचे सेवन गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हीही भोपळ्याच्या बिया फेकत असाल तर आधी त्याचे फायदे जाणून घ्या.
भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आणि शरीरासाठी आवश्यक पोषक घटक असतात, मॅग्नेशियम देखील त्यापैकी एक आहे. प्राण्यांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की भोपळ्याच्या बियांचे तेल उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम हृदयरोगाचा धोका कमी करण्यासोबतच हाडे निरोगी ठेवण्यासाठी मधुमेहींसाठी फायदेशीर मानले जाते.
भोपळ्याच्या बियांचे सेवन मधुमेहामध्ये खूप फायदेशीर मानले जाते. भोपळ्याच्या बियांची पावडर आणि त्याचा अर्क हे दोन्ही रक्तातील साखर कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, भोपळ्याच्या बियांची पावडर खाल्ल्याने टाइप-2 मधुमेह असलेल्या लोकांना फायदा होतो.
भोपळ्याच्या बिया आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहेत. सोललेल्या बिया (28-ग्रॅम) पासून 1.1 ग्रॅम फायबर मिळू शकते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन पचनाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हृदयविकार, टाईप-२ मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्यांना आहारात उच्च फायबरयुक्त पदार्थांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अन्न पचण्यासोबतच पोट बरोबर ठेवण्यासाठीही याचा फायदा होतो.
मॅग्नेशियम हाडे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांपैकी एक आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये हे मुबलक प्रमाणात आढळते. मॅग्नेशियमयुक्त आहार हाडांची घनता सुधारण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या रोगांचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे.