मुंबईः आजच्या काळातील टेक्नॉलॉजीचा मोठ्यांपासून- लहान मुलांपर्यंत, सर्वांना खूप फायदा होतो. मुलांना त्यातून खूप काही शिकायला मिळतं. मात्र एखादी गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्यामुळे नुकसानही होऊ शकतं. जर तुमची मुलं गरजेपेक्षा जास्त वेळ टीव्ही (Television) बघत असतील किंवा त्यांचा स्क्रीन टाईम (Screen Time)जास्त असेल, तर हे त्यांच्या डोळ्यांसाठी आणि एकंदर आरोग्यासाठीही धोकादायक ( bad for eyes and health) ठरू शकतं. टीव्हीसमोर बसून बसून डोळ तर खराब होतातच पण हे शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठीही चांगलं नसतं. मुलांची ही सवय सोडवण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील, मात्र भविष्यात त्याचा चांगलाच फायदा दिसून येईल. कधी गोड बोलून, कधी समजावून मुलांना जास्त वेळ टीव्ही बघण्याचे दुष्परिणाम सांगता येतील. काही साध्या , सोप्या उपायांनी ही सवय सोडवता येऊ शकेल.
टीव्ही द्वारे मुलं गोष्टी, गाणी ऐकतात, वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात. मात्र जास्त वेळ टीव्ही पाहिल्यास त्यांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो.
-खूप वेळ टीव्ही पाहत त्यासमोर बसून राहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. टीव्हीच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येतो. एकाच जागी सतत बसून टीव्ही पाहिल्याने शारीरिक हालचाल अतिशय कमी होते. त्यामुळे मुलं स्थूल होऊ शकतात. वाढत्या वयात मुलांनी खूप खेळलं पाहिजे, एकाच जागी बसल्याने त्यांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो.
– टीव्हीवर जे दिसतं ( गोष्टी, गाणी) त्याचे अनुकरण मुलं करतात आणि तशीच वागतात. मारधाड, हिंसा असलेली दृश्य मुलांनी पाहिल्यास त्यांचा त्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मुलं टीव्हीवर काय बघतात याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
– एकाच जागी बसून राहिल्याने मुलांना पाठदुखी, मानदुखी अशा समस्याही उद्भवू शकतात. लहान वयातच शरीराचे असे आजार होणं चांगलं नाही.
– सतत टीव्ही पाहिल्याने, मुलं घरातच बसून राहतात. बाहेर खेळत नाहीत. अशाने ती आळशी होतात. ते ओव्हर-इटिंगही ( Over-eating) करू शकतात, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
– मुलांनी जास्त वेळ टीव्ही पाहू नये, त्यांचा स्क्रीन टाइम कमी व्हावा असे वाटत असेल तर प्रथम तुम्हालाही तसेच वागावे लागेल. पालक काय सांगतात, यापेक्षा पालक काय करतात याकडे मुलांचे लक्ष असते. ती अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे तुम्ही स्वत:ला चांगल्या सवयी लावल्यात, तर आपोआप मुलांनाही त्या लागतील. तुम्ही टीव्ही बघणे कमी करा, मुलांचाही टीव्ही नक्की कमी होईल.
– मुलांना सतत कशात ना कशात तरी गुंतून रहायला आवडते. त्यामुळे त्यांना जी गोष्ट करायला आवडते, उदा. खेळणे, चित्र काढणे, रंगवणे, पझल्स सोडवणे, त्या गोष्टी त्यांना करायला द्या.
– त्यांना एखादी नवा खेळ, कला शिकवा. त्यांचे लक्ष त्यावर केंद्रित होईल. नवनव्या गोष्टी शिकल्याने त्यांच्या मेंदूचा विकास होईल आणि एकाग्रताही वाढेल.
– टीव्ही बंद झाला तर काय करायचं असा प्रश्न मुलांना पडतो. त्यांना बाहेर जाऊन खेळायला प्रोत्साहन द्या. तुम्ही स्वत: थोडा वेळ काढा आणि त्यांच्यासोबत खेळा. हळूहळू त्यांची गॅजेट्सची सवय कमी होत जाईल.