आपल्या निरोगी आहारासाठी आपण नेहमी ताज्या फळ भाज्यांचे सेवन करत असतो. जेणेकरून आपल्या शरीराला चांगले पोषक घटक मिळतात. यासाठी भाज्या हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. आजकाल बिझी लाईफस्टाईलमुळे अनेक महिला आठवडाभर एकत्र भाजी विकत घेतात. परंतु महागाई हेही एक कारण आहे, ज्यामुळे अनेकजण बाजारात कमी दराने भाजीपाला खरेदी करणे पसंत करतात. एवढ्या भाज्या विकत घेतल्यानंतर या भाज्यांना व्यवस्थित ठेवणे म्हणजे तारेवरची कसरत होते.
त्यात आठवडाभराच्या भाज्या खरेदी केल्यानंतर भाज्या नीट ठेवल्या नाहीत तर त्या खराब होऊ लागतात. त्यातच ह्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होणार नाहीत, असे काही लोकांचे मत आहे. पण अनेकदा काही भाज्या या २-३ दिवसात न वापरल्यास फ्रीजमध्ये सुद्धा खराब होऊ लागतात. अशावेळी आम्ही तुम्हाला ते नीट ठेवण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत.
भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी काही भाज्या अश्या असतात ज्या थंड पाण्यात ठेवू शकता. गाजर, कोबी आणि बटाटे यासारख्या भाज्या थंड पाण्यात ठेवून तुम्ही ताज्या ठेवू शकता. दर दोन दिवसांनी पाणी बदलण्याची खात्री करा. त्यासोबतच सफरचंद, बेरी आणि काकडी ही फळं देखील पाण्यात ठेवू शकता.
आठवडाभराच्या भाज्या आणल्यानंतर तुम्ही त्या खराब होऊ नये यासाठी व्हिनेगरचा वापरू करू शकता. याकरिता पाण्यात व्हिनेगर घालून त्यात फळे किंवा भाज्या ५ मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर पाण्यातून भाज्या काढून घ्या आणि थोडावेळ भाज्या तसेच ठेवा. काहीवेळाने या भाज्यांमधील पाणी सुकल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे भाज्या जास्त काळ टिकू शकतील.
हिवाळा या ऋतूत हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणात मिळतात. पालक, मेथी,माठाची भाजी, शेपू अशा हिरव्या पालेभाज्या भरपूर खाल्ल्या जातात. पण या पालेभाज्या बरेच दिवस असेच ठेवल्याने खराब होऊन जातात. जर तुम्ही भरपूर हिरव्या पालेभाज्या खरेदी केल्या असतील तर त्या काही दिवस चांगल्या राहण्यासाठी पेपर टॉवेल मध्ये ठेऊन फ्रिज मध्ये ठेऊ शकतात. यामुळे भाजीपाल्यातील ओलाव्याचे प्रमाण कमी होऊन ती दीर्घकाळ ताजी राहते.