पावसाळ्यात वाढतो फंगल इन्फेक्शनचा धोका, अशी घ्या तुमच्या पायांची काळजी

| Updated on: Jun 27, 2023 | 3:34 PM

पावसाळ्याच्या दिवसांत पायांना फंगल इन्फेक्शन होऊन बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. रस्त्यावरील घाण पाण्यामुळे ही समस्या उद्भवते. अशावेळी काही उपायांच्या मदतीने हा त्रास कमी होऊ शकतो.

पावसाळ्यात वाढतो फंगल इन्फेक्शनचा धोका, अशी घ्या तुमच्या पायांची काळजी
Follow us on

पावसाळा हा अनेक आजार (diseases in monsoon) घेऊन येतो. रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे बराच त्रास होऊ शकतो. पावसाच्या पाण्यामुळे कधीकधी संसर्ग (infection) होतो. विशेषत: पायांना जास्त त्रास होऊ शकतो. खाज सुटणे, जखम होणे, पायाच्या बोटांच्या दरम्यान इन्फेक्शन होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

या प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गामुळे बराच काळ त्रास होतो कारण ओलावा आणि घाणीमुळे आपली त्वचा खराब होऊ शकते. अशा स्थितीत वेदनाही होऊ शकतात.

या समस्यांपासून वाचायचे असेल आणि पायाची योग्य काळजी घ्यायची असेल तर काही उपाय करता येतात. पायाला फंगल इन्फेक्शन झाले असेल तर काही घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.

मीठाच्या पाण्यात पाय बुडवावेत.

अस्वच्छ पाण्यामुळे पाय खराब झाले असतील किंवा इन्फेक्शन झाले असेल हा उपाय नक्की करून पहा. घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवा. त्यानंतर एका टबमध्ये सोसवेल इतके गरम पाणी घेऊन त्यात दोन चमचे मीठ घालावे. नंतर त्यात पाय बुडवून बसावे. अर्ध्या तासासाठी पाया मीठाच्या पाण्यातच ठेवावे. नंतर बाहेर काढून नीट कोरडे करावे. बोटांच्या मधील जागाही नीट टिपून कोरडी करावी. मीठ हे अँटी-बॅक्टेरिअल असते, त्यामुळे सूज आणि इन्फ्केशन कमी होण्यास मदत होते. तसेच त्यामुळे जळजळ व खाजेचा त्रासही कमी होतो.

कडुनिंबाच्या पानांचा लेप

कडुनिंब हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असते, त्यामुळे पायांची खाज कमी होऊ शकते. यासाठी कडुनिंबाची पाने घेऊन ती स्वच्छ धुवा आणि त्याची पेस्ट बनवा. पायाला जिथे संसर्ग झाला असेल तिथे ही पेस्ट लावू थोडा वेळ राहू द्या. ती वाळल्यानंतर काढून टारा आणि पाय स्वच्छ धुवून कोरडा करावा. नियमितपणे हा उपाय केल्यावर पायाची ही समस्या कमी होते.

ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अनेक अँटीफंगल गुणधर्म असतात, जे खाज आणि संसर्ग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. याचा वापर करण्यासाठी थोड्याशा पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिसळला आणि ते मिश्रण इन्फेक्शन झालेल्या भागावर लावा. हे जमत नसेल तर एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात ॲपल सायडर व्हिनेगर मिसळा व त्यात पाय बुडवून बसा. यामुळे पायाचे इन्फेक्शन तसेच खाज कमी होण्यास मदत होऊ शकेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)