उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकजण त्वचेची आणि त्याचबरोबर शरीराची काळजी घेण्यास सुरूवात करतात. पण या कडक उन्हाळ्यात त्वचेबरोबर केसांचीही काळजी घ्यावी लागते. उन्हाच्या तीव्रतेमुळे केसांवरही वाईट परिणाम होतो. तीव्र प्रकाश, वातावरणातील बदल, गरम हवामान आणि घाम यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत होऊ शकतात. याशिवाय डोक्यातील कोंडा, केस गळणे आणि तेलकट टाळू यासारख्या समस्या देखील वाढू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून त्यांचे आरोग्य अबाधित राहील.
अशा परिस्थितीत तुम्ही जर योग्य केसांची काळजी घेतली तर उन्हाळ्यातही तुमचे केस रेशमी, मुलायम आणि निरोगी राहू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी हे सांगणार आहोत, जेणेकरून ते दीर्घकाळ सुंदर आणि मजबूत राहतील.
तुम्ही जेव्हा उन्हाळ्यात घरा बाहेर पडता तेव्हा केसांना येणारा घाम आणि धूळ केसांना लवकर खराब करते. ज्यामुळे टाळू तेलकट आणि केस चिकट होतात. म्हणून आठवड्यातून किमान २-३ वेळा सौम्य शाम्पूने केस धुवा. केस जास्त कोरडे होऊ नयेत म्हणून सल्फेट-फ्री शाम्पू वापरा. केस धुण्यासाठी कोमट किंवा थंड पाणी वापरा कारण गरम पाणी तुमचे केस कमकुवत करू शकते.
नॅचरल हेअर मास्क केसांना आवश्यक ओलावा आणि पोषण प्रदान करतात. आठवड्यातून एकदा DIY हेअर मास्क लावा. उदाहरणार्थ, कोरड्या केसांसाठी, दह्यात नारळाचे तेल आणि मध मिक्स करा आणि हेअर मास्क म्हणून लावा. ज्या लोकांची टाळू खुप तेलकट आहे त्यांनी केसांना कोरफड जेल, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी एकत्र करून त्यांचा हेअर मास्क लावू शकतात.
हीट स्टाइलिंग असलेले हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, कर्लिंग आयर्न यासारखे उत्पादनांचा वापर केल्यास केस कोरडे आणि कमकुवत बनवू शकतात. जर अगदी गरज असेल तर केसांना स्प्रे लावल्यानंतरच त्यांचा वापर करा. हेअर ड्रायर वापरण्याएवजी केस नैसर्गिकरित्या सुकवण्याची सवय करा.
उन्हाळ्यात केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही केसांना खुप चिकटपणा व तेलकटपणा जाणवणार नाही अशी हलके तेल वापरा. जसे की तुम्ही टाळू थंड ठेवण्यासाठी नारळाचे तेल लावू शकता. केसांना कुरळेपणा नसण्यासाठी, आर्गन तेल वापरा आणि केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी, ऑलिव्ह तेल वापरा. तेल लावल्यानंतर किमान १-२ तासांनी केस सौम्य शाम्पूने धुवा.
तीव्र सूर्यप्रकाश केसांमधील नैसर्गिक प्रथिने (कॅरोटीन) खराब करू शकतो. म्हणून, जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा स्कार्फ किंवा टोपी घाला. किंवा यूव्ही प्रोटेक्शन हेअर स्प्रे वापरा, जेणेकरून केस सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहतील.
केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळविण्यासाठी अंडी, मसूर, दूध आणि सोयाबीनचे सेवन करा. ओमेगा-३ फॅटी अॅसिडसाठी अक्रोड, जवस, मासे यांचे सेवन करत राहावे. केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि डिहायड्रेशन टाळा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)