हिवाळ्याच्या ऋतूत आपण सगळेजण थंडी पासून बचाव करण्यासाठी लोकरीचे कपडे परिधान करत असतो. थंडीत स्वत: बरोबरच लोकरीच्या कपड्यांचीही चांगली काळजी घ्यावी लागते. ज्याप्रमाणे या ऋतूत आपली त्वचा कोरडी पडते आणि ती चमकदार होण्यासाठी विविध उपायांचा वापर केला जातो, तसाच हिवाळ्यात परिधान केलेल्या लोकरीच्या कपड्यांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. लोकरीचे कपडे खूप जाड आणि उबदार असतात. ते लवकर घाण होत नाहीत. त्यामुळे ते रोज धुतले जात नाहीत. मात्र लोकांना ते धुताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घरात लोकरीचे कपडे धुतल्यानंतर त्यांची चमक निघून जाते, अशी अनेकांची तक्रार असते. त्यांची चमक आणि कोमलता कमी होते.
जर तुम्हालाही हीच समस्या भेडसावत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही अशा काही टिप्स शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला घरी आरामात लोकरीचे कपडे धुण्यास मदत होईल, त्यानंतर त्यांची चमक आणि कोमलता देखील कायम राहील.
आपण नेहमीचे कपडे धुऊन घेतो त्याप्रमाणे लोकरीचे कपडे कधीच धुऊ नका. कारण लोकरीचे कपडे धुण्याची देखील एक योग्य पद्धत आहे. व्यवस्थित धुतलेल्या कपड्यांची चमक आणि कोमलता अबाधित राहते. यासाठी तुम्हाला काही खबरदारी घेण्याची गरज आहे. लोकरीचे कापड धुण्यासाठी आपण या कपड्यांसाठी नेहमीच सौम्य सर्फ किंवा साबण वापरावे. लोकरीचे कपडे डिटर्जंटने कधीही धुवू नयेत.
काही लोकं इतर सर्व कपड्यांप्रमाणेच वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुण्यास टाकतात. पण लोकरीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुणे योग्य नाही. लोकरीचे कपडे नेहमी हाताने धुवावेत. यामुळे त्यांची चमक अबाधित राहील.
लोकरीचे कपडे खूप गरम पाण्यात धुवू नका. असे कपडे धुण्यासाठी नेहमी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करावा. तसेच कपडे धुतल्यानंतर मऊ ब्रशने हे कपडे स्वच्छ करा. अन्यथा लोकरीचे कापड तुम्ही जर तुमच्या नेहमीच्या कडक ब्रशने धुतले तर लोकर लवकर खराब होईल.
लोकरीचे कपडे भिजल्यानंतर जड होतात. अशा वेळी लोक लोकरीच्या कपड्यातून पाणी काढून टाकण्यासाठी त्याना पिळून घेतात, जेणेकरून कपड्यातील सगळं पाणी काढता येते . तथापि धुतल्यानंतर लोकरीचे कपडे पिळू नका. त्याऐवजी त्यांना हँगरमध्ये अडकवून तसेच वाळत घाला. कारण तुम्ही जर हे कपडे नेहमीसारखे पिळुन वाळत घातल्यास लोकरीच्या कपड्यांमध्ये सुरकुत्या पडतात, ज्यामुळे ते जुने दिसतात. तसेच लोकरीचे कपडे धुताना पाण्यात फिटकरी घाला जेणेकरून लोकरीच्या कपड्यांचा रंग फिकट होणार नाही.
लोकरीच्या कपड्यांची काळजी घेण्यासाठी कडुनिंबाची वाळलेली पाने वॉर्डरोबमध्ये ठेवताना त्यांच्यामध्ये ठेवा. यामुळे लोकरीच्या कपड्यांतील किडींचा प्रतिबंध होतो.