नवी दिल्ली – ब्रोकोली (Broccoli) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ही एक हिरवी भाजी आहे, जी फ्लॉवरसारखी दिसते. शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक घटक (nutrition) यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ब्रोकोलीमध्ये प्रोटीन, झिंक, फायबर, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. ज्यामुळे आपल्या आरोग्याचे अनेक आजारांपासून (health diseases) संरक्षण होते. अनेक जण ब्रोकोलीचा सॅलॅड किंवा सूपमध्ये समावेश करून खातात, तर काहींना त्याची भाजी आवडते. ब्रोकोली खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
1) उच्च रक्तदाब नियंत्रित करते
ब्रोकोलीमध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम हे भरपूर प्रमाणात आढळते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही ब्रोकोलीचा आहारात समावेश करू शकता.
2) हृदयाचे आरोग्य स्वस्थ ठेवते
ब्रोकोलीमध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म भरपूर असतात. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण होते. हृदयाचे आरोग्य राखायचे असेल तर आहारात ब्रोकोलीचा समावेश अवश्य करावा.
3) वजन कमी करण्यासाठी
ब्रोकोलीमध्ये फॅट आणि कॅलरीज अतिशय कमी असतात. तसेच त्यामध्ये फायबरही मुबलक प्रमाणात आढळते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ब्रोकोलीचे सेवन करू शकता. यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते व तुम्ही अती खाणे टाळू शकता.
4) केसांसाठी फायदेशीर
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-ए आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे केस मजबूत करण्यासाठी प्रभावी ठरतात. ब्रोकोलीच्या सेवनाने आपले केस गळणे थांबते. निरोगी केसांसाठी, तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा कच्च्या ब्रोकोलीचे सेवन करू शकता.
5) हाडांचे आरोग्य चांगले राखते
ब्रोकोली खाल्याने हाडे मजबूत होतात. त्यामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन-के हे मुबलक प्रमाणात आढळतात. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी ब्रोकोलीचा आहारात समावेश केला पाहिजे.
6) डोळ्यांचे आरोग्य सुधारते
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-ए भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी व दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही ब्रोकोली खाऊ शकता.