नवी दिल्ली : अनेकदा आपण त्वचेचा किंवा त्वचेवरील केसांचा रंग हलका करण्यासाठी किंवा डार्क पिगमेंटेशन कमी करण्यासाठी ब्लीच (Bleach) करतो. ब्लीच हे एक कंपाऊंड आहे जे त्वचा आणि केसांव्यतिरिक्त, स्वच्छता आणि जंतुनाशक (Bacterial Disinfectant) साठी देखील वापरले जाते. ब्लीच हे बहुतेक प्रकारचे व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी नष्ट करू शकतात. जास्त प्रमाणात वापरल्यास ब्लीच हे आपल्या त्वचेसाठीदेखील हानिकारक ठरू शकते. यामुळे त्वचेची जळजळ देखील होऊ शकते. याला ब्लीच बर्न (Bleach burn)) म्हणतात. ब्लीच बर्न कसे होते आणि ते झाल्यास काय उपचार करावेत हे जाणून घेऊया.
ब्लीच बर्न म्हणजे काय ?
ब्लीचमुळे विषारीपणाचा धोका असतो. ब्लीच जास्त प्रमाणात वापरल्यास किंवा त्याची इतर रसायनांशी प्रतिक्रिया झाल्यास ब्लीच बर्न होते. ही एक गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठतात, प्रसंगी त्वचा जळतेही. याला तांत्रिकदृष्ट्या रासायनिक बर्निंग म्हणता येईल. ब्लीच बर्न्समुळे त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते. म्हणून, ब्लीच वापरण्यापूर्वी, त्याचे प्रमाण योग्यरित्या ओळखले पाहिजे. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
ब्लीच बर्न्समुळे होणारी वेदना, लालसरपणा आणि सूज
संशोधकांच्या मते, ब्लीच बर्न्स सामान्य बर्न्ससारखेच दिसतात. उष्णतेमुळे होणाऱ्या जळजळीप्रमाणेच, ब्लीच बर्न्समुळे वेदना, लालसरपणा, सूज, फोड येणे असा त्रास किंवा त्वचेचे अधिक गंभीर नुकसान होऊ शकते.
ब्लीच बर्न झाल्यास ते बरे करण्यासाठी काही उपाय करावेत
1) ब्लीच बर्न झालेली जागा स्वच्छ करा
ब्लीच करताना तुमच्या त्वचेवर जळजळ जाणवली तर लगेच ब्लीच धुवा. जळलेली जागा आणि त्याच्या सभोवतालची जागा पूर्णपणे धुवा. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सॉफ्ट आणि औषधी साबण वापरू शकता.
2) इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी नॉन-स्टिक बँडेज वापरा (Non stick Bandage)
ब्लीचमुळे जो भाग जळाला असेल त्याचे धूळ, घाण आणि इतर संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी तेथे नॉन-स्टिक बँडेज लावावे. दिवसातून दोनदा ते बदलावे. जर ते ओले किंवा घाण झाले तर ते लगेच बदला.
3) अँटी-इन्फ्लेमेटरी औषध वापरा
ब्लीच बर्न हे खूप वेदनादायक असू शकते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही नॉन-स्टेरयडल, अँटी-इन्फ्लेमेटरी औषधांचे सेवन केले जाऊ शकते.
4) कोरफड ठरेल गुणकारी
ब्लीच बर्न झाल्यास तेथे कोरफड लावता येते. जळलेली जागा धुतल्यानंतर कोरफड जेलचा पातळ थर लावून तेथे बँडेज लावावे. अँटी बॅक्टेरियल कोरफडीमुळे ब्लीच बर्न लवकर बरे होते.
5) डॉक्टरांचा सल्ला घ्या
या सर्व उपायांनी जर ब्लीच बर्न कमी होत नसेल, तर लगेच डॉक्टरांना भेटून उपचार करा. अन्यथा ही स्थिती गंभीर होऊ शकते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)