महाराष्ट्रातील पहिले नौदल संग्रहालय कल्याणमध्ये उभारणार, जपल्या जाणार इतिहासाच्या पाऊलखुणा!

| Updated on: Feb 03, 2021 | 10:38 AM

महाराष्ट्र राज्यातील पहिले वाहिले नौदल संग्रहालय कल्याण जवळील खाडीच्या किनाऱ्याजवळ असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला उभारण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील पहिले नौदल संग्रहालय कल्याणमध्ये उभारणार, जपल्या जाणार इतिहासाच्या पाऊलखुणा!
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील पहिले वाहिले नौदल संग्रहालय कल्याण जवळील खाडीच्या किनाऱ्याजवळ असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला उभारण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर विकास योजनेत याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याचा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे (Maharashtra’s first naval museum  in kalyan).

स्वराज्याच्या पाऊलखुणा

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला नौदल तळ कल्याणच्या खाडी नजीक याच दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारला होता, असे म्हटले जाते. तथापि, काळाच्या ओघात इतिहासाची ही पावले पुसली गेली आहेत आणि आता त्यांचा माग काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. हे आधुनिक संग्रहालय एक नौदल जहाज प्रकारची रचना असेल, ज्यात आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विराट या युद्धनौकांसह विविध नौदल जहाजांची माहिती देखील असेल.

यात भारतीय नौदल आणि गृह सभागृहांचा इतिहास देखील दाखवला जाईल. ज्यात नौदलात गेली वर्षानुवर्षे होत असलेले बदल दाखवत नौदलाच्या कर्तुत्वावर चित्रपट दाखवले जातील.

देशाच्या भावी पिढीला प्रेरणा

महाराष्ट्रातील हे पहिले नौदल संग्रहालय उभारण्यासाठी कल्याण नागरी संस्थेने भारतीय नौदलाची मदत घेतली आहे. देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याची, तसेच तरुण विद्यार्थ्यांना अर्थात देशाच्या भावी पिढीला भारतीय नौदलात सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठीची ही विशेष योजना आहे (Maharashtra’s first naval museum in kalyan).

लवकरच निघणार निविदा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या संग्रहालयासंदर्भात एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की, “हे नौदल संग्रहालय कल्याण खाडीच्या, तसेच दुर्गाडी किल्ल्याच्या आणि दुर्गाडी पुलाच्या दरम्यानच्या 4 एकर जमिनीवर बांधले जाणार आहे. बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील.”

पर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राखीव निधीचा वापर करून हे नौदल संग्रहालय तयार केले जाईल. नौदल संग्रहालयाबरोबरच कल्याण खाडीच्या पलिकडे 5 किमी लांबीच्या भागातील पाणथळ जागेला विकसित करण्याचीही महापालिकेची योजना आहे. जी भविष्यात पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे.

(Maharashtra’s first naval museum in kalyan)

हेही वाचा :