आपल्या घरात जेव्हा एखादा मलाईदार पदार्थ बनवला जातो तेव्हा खास करून ताजी फ्रेश मलाईचा वापर केला जातो. तसेच मलाईच्या क्रिमीपणामुळे अनेकांना मलाई खायला खूप आवडते. स्वयंपाकघरातील अनेक भाज्यांमध्ये याचा वापर केला जातो. इतकंच नाही तर काही घरांमध्ये मलाईपासून देशी तूप काढलं जातं. स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींमध्ये मलाईचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का मलाई देखील स्किनकेअर रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे.
मलाईमध्ये फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे हे त्वचेसाठी एक उत्तम मॉइश्चरायझर बनू शकते. हिवाळ्याच्या दिवसात त्वचा कोरडी पडणे सामान्य आहे. त्यामुळे तुमच्या रोजच्या स्किन केअर रुटिंगमध्ये तुम्ही मलाईचा वापर करून कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून मुक्त मिळवू शकता. तर त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी मलाईचा फेसपॅक तयार करून यात काही घरगुती गोष्टींचा वापर करून चेहऱ्यावर लावू शकता. चला जाणून घेऊयात.
मलाई आणि हळद फेस पॅक
मलाई आणि हळदीचा फेसपॅक तुम्हाला उत्तम रिझल्ट देऊ शकतो. ते बनवण्यासाठी २ चमचे मलाई, १ चमचा हळद पावडर आणि १ चमचा मध एकत्र मिक्स करून घ्या. व त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. हे 10 मिनिटे चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. हा फेसपॅक हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून तुमचे रक्षण करेल आणि हायपरपिग्मेंटेशनची समस्या देखील कमी करेल.
मलाई आणि बेसन फेस पॅक
मलाईमध्ये बेसन मिक्स करून हिवाळ्यात तुम्ही स्वत:साठी हायड्रेटिंग फेसपॅक बनवू शकता. २ चमचे मलाई , १ चमचा बेसन आणि १ चमचा गुलाबजल एकत्र मिसळून पेस्ट तयार करा. नंतर हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने थंडीत होणाऱ्या कोरड्या त्वचेपासून मुक्तता मिळते आणि त्वचा चमकदार दिसते.
मलाई आणि कोरफड फेस पॅक
मलाई आणि कोरफड फेसपॅक बनवण्यासाठी २ चमचे मलाई , १ चमचा कोरफड जेल आणि १ चमचा मध एकत्र मिसळा. त्यानंतर तयार फेसपॅक चेहऱ्यावर कमीत कमी २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक तुमच्या त्वचेला लवकर मॉइश्चरायझ करेल. याशिवाय हा फेसपॅक केवळ तुमची त्वचा हायड्रेट करत नाही तर कोरडी त्वचेमुळे होणारी जळजळ देखील कमी करतो.