आपण मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वाना दूध प्यायला देत असतो. कारण दूध हे संपूर्ण आहार मानला जातो. यामुळे शरीरातील जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिनांची कमतरता भरून निघते. दूध प्यायल्याने शरीर निरोगी राहते आणि हाडे देखील मजबूत होण्यास मदत होते, परंतु तुम्हाला माहित आहे का काही लोकांना दुधाची ॲलर्जी असू शकते. अशी ॲलर्जी जी सहजासहजी ओळखता येत नाही. दूध आपल्याला शरीरासाठी योग्य आहे का आणि त्यापासून ॲलर्जीची लक्षणे कोणती आहेत. याविषयी जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुधाचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात, परंतु काही लोकांना त्याची ॲलर्जी देखील असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती दुधातील प्रथिने योग्यरित्या ओळखत नाही तेव्हा ते ॲलर्जीची लक्षणे दर्शवतात. यामध्ये दूध प्यायल्यानंतर त्वचेला लालसरपणा येणे, खाज सुटणे, सूज येणे आणि पुरळ उठण्याची समस्या उद्भवते. तसेच चेहऱ्याच्या त्वचेवर सूज किंवा फुगीरपणा देखील येऊ शकतो, जो विशेषत: डोळ्यांखाली आणि गालांवर अधिक दिसून येतो. काही लोकांच्या चेहऱ्यावर लहान फोड देखील येऊ शकतात.
दुधाच्या ॲलर्जीची लक्षणेही या भागांवर दिसतात
दिल्लीतील श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील त्वचारोग विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विजय सिंघल सांगतात की, चेहऱ्याव्यतिरिक्त शरीराच्या इतर भागांवरही दुधाच्या ॲलर्जीची लक्षणे दिसू शकतात. यामध्ये दूध प्यायल्याने पोटदुखी, अतिसार, उलट्या आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. यावेळी तुम्ही जर ॲलर्जीनची समस्या योग्यवेळी डॉक्टरांना दाखवल्यास लक्षणे गंभीर होण्यापासून रोखू शकतात.
उपचार कसे केले जातात?
दुधाच्या ॲलर्जीचा उपचार सहसा ॲलर्जी नियंत्रण औषधांसह केला जातो. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेचा अवलंब करून तुमच्या आहारात बदल करून या समस्येवर सहज नियंत्रण मिळवता येते. जर तुम्हाला दुधाची ॲलर्जी असेल तर तुम्ही दूध पिऊ नये हे खूप महत्वाचे आहे. त्याऐवजी कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेला आहार घ्या. अशाने तुम्हाला दुधाच्या ॲलर्जीच्या समस्या निर्माण होणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)