मुंबई | 17 मार्च 2024 : मार्च महिन्याच्या मध्यावधीत आपण आहोत. सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेक समस्या जाणवू शकतात. अनेकदा आपण आजारीही पडू शकतो. अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. मात्र आहारात थोडासा बदल केला तर आपण या कडक उन्हाळ्यातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी रोजच्या खानपानाच्या सवयींमध्ये तुम्हाला थोडा बदल करावा लागेल. काही पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला त्रास जाणवणार नाही. हे पदार्थ नेमके कोणते आहेत? कोणत्या फळांचा ज्यूस प्यावा? जाणून घेऊयात…
मौसम कोणताही असो. तुमचा आहार तुमच्या शरिरावर परिणाम करतो. त्यामुळे सकस आहार असेल याची काळजी नेहमीच घेतली पाहिजे. शक्यतो लहानपणापासून खास आलेली भाजी – पोळी याचा जेवणात समावेश असू द्या.
या उन्हाळ्याच्या मौसमात तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करावा लागेल. तसं केल्यास तुमच्या शरिरात सकारात्मक बदल दिसतील. रोजच्या जेवणात एक तरी पातळ भाजी असेल याची काळजी घ्या. शिवाय गाजर, काकडी या सारख्या फळांचाही जेवणात समावेश करा. तसंच जेवताना तुम्ही दही देखील खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरिराचं तापमान कमी होण्यास मदत होईल.
उन्हाळ्याच्या दिवसात शरिरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणीदार फळांचा जेवणात समावेश करा. कलिंगड, खरबूज, द्राक्षे या सारखी फळं रोज खालली जातील, याकडे लक्ष द्या.
उन्हाळ्याच्या दिवसात जितकं पाणी तुमच्या शरिरात जाईल, तितकं चांगलं…. त्यासाठी दिवसातून किमान एखादा तरी ज्यूस प्या… यात कलिंगड, खरबूज, पाईनअॅपल या फळांचा समावेश असू द्या. याशिवाय जितकं ताक प्याल तितकं शरिर ताजं तवानं राहतं. त्यामुळे शक्य होईल तेव्हा ताक आणि लस्सी प्या. याशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या.
टीप- ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करा. या टिप्स फॉलो करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.