अरुणाचल प्रदेशातील लोक सर्वाधिक निगेटिव्ह, नंतर मध्यप्रदेश, महाराष्ट्र कितवा?, कोविडनंतर कुठे बिघडलं?; अहवाल काय सांगतो?

| Updated on: Mar 22, 2023 | 7:42 AM

पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा सकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या भारतीयांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. वर्षभरापूर्वी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या लोकांची टक्केवारी 70 होती, यंदा हा आकडा 67 टक्क्यांवर आला आहे.

अरुणाचल प्रदेशातील लोक सर्वाधिक निगेटिव्ह, नंतर मध्यप्रदेश, महाराष्ट्र कितवा?, कोविडनंतर कुठे बिघडलं?; अहवाल काय सांगतो?
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना महामारीने जगभरातील लोकांच्या अडचणी वाढवण्याचे काम केले आहे. या विषाणूचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर (mental health) वाईट परिणाम झाला आहे. कोरोना महामारीच्या (corona) काळापासून भारतातील लोकांमध्ये राग, तणाव, चिंता आणि दुःख यासारख्या नकारात्मकतेच्या (negative feelings) भावनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, असे एका अभ्यासातून असे दिसून आले आहे.

हॅप्पीप्लस या कन्सल्टिंग कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘द स्टेट ऑफ हॅप्पीनेस-2023’ या अहवालानुसार, भारतीय लोकांमध्ये नकारात्मकता आणि दुःखाची भावना वाढली आहे. या अभ्यासात सहभागी झासलेल्या 35 टक्के लोकांनी कबूल केले की ते या सर्व नकारात्मक भावनांना तोंड देत आहेत. गेल्या वर्षी केलेल्या संशोधनाबद्दल सांगायचे झाले तर 2022 मध्ये 33 टक्के लोकांनी अशी नकारात्मक भावना व्यक्त केली होती. मात्र यावर्षी या समस्येशी झगडणाऱ्या लोकांची टक्केवारी 2 टक्क्यांनी वाढली आहे.

अरुणाचल प्रदेश आहे अग्रस्थानी

निगेटीव्ह ॲटिट्यूड अथवा नकारात्मक दृष्टिकोनाच्या बाबतीत अरुणाचल प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या अभ्यासात सहभागी असलेल्या सुमारे 60 टक्के लोकांनी कबूल केले की ते आनंदी नाहीत. या यादीत मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 58 टक्के लोकांनी आपण नाखूष असल्याचे सांगितले. तर गुजरात आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर राहिले, तेथे प्रत्येकी 51 टक्के लोकांनी नकारात्मक दृष्टीकोन आणि नाखूष असल्याचे सांगितले.

या अभ्यासानुसार, सकारात्मक दृष्टिकोन अथवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बाळगणाऱ्या भारतीयांच्या संख्येतही झपाट्याने घट झाल्याचे दिसून आले आहे. वर्षभरापूर्वी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या लोकांची टक्केवारी 70 होती, यंदा हा आकडा 67 टक्क्यांवर आला आहे. ‘लाइफ असेसमेंट स्कोअर’मध्येही घसरण झाली आहे. 2023 मध्ये हा आकडा 10 पैकी 6.08 होता. तर गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये हा आकडा 6.84 इतका नोंदवला गेला.

नाखुष असण्याची आहेत अनेक कारणे

या सर्वेक्षणानुसार, कोरोना महामारीनंतर भारतीय लोक आनंदी नसण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे आर्थिक समस्या, कामाच्या ठिकाणी वाढता दबाव, सामाजिक स्थिती, एकाकीपणा, लोकांशी संपर्क तोडणे, इत्यादी आहेत. भारतातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील 14000 लोकांवर केलेल्या संशोधनानुसार, विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकतेची पातळी सर्वाधिक वाढली आहे आणि या संपूर्ण कालावधीत त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

तसेच 18 वर्षांखालील व्यक्ती आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये राग आणि दुःखाची पातळी सर्वाधिक आहे. या अभ्यासात समाविष्ट असलेल्या या दोन वयोगटांपैकी 10 पैकी 5 जणांनी आपण नाखुश आणि दुःखी असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी 10 पैकी फक्त दोन लोकांना असे वाटत होते.

या अहवालात असेही म्हटले आहे की 2021 मधील 12 टक्क्यांच्या तुलनेत 2023 मध्ये 20 टक्के भारतीय लोक त्रस्त आहेत. तर 63 टक्के लोक संघर्ष करत आहेत ज्याचे मागील वर्षी प्रमाण 49 टक्के होते. दुसरीकडे, गेल्या वर्षी 39 टक्क्यांच्या तुलनेत यंदा केवळ 17 टक्के भारतीयांना त्यांची भरभराट होत असल्याचे वाटते.