नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : दिवाळी आता तोंडावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक गोष्टीची घाई उडाली आहे. खरेदीची योजना होत आहे. घराला रंगरंगोटी, सजावट सुरु आहे. लोक अनेक तयारीत गुंतली आहेत. दिवाळीत मौल्यवान दागिणे घालण्याची परंपरा आहे. लक्ष्मी पुजनापासून तर इतर वेळी सोन्या-चांदीची दागिन्यांची हौस पुरवली जाते. सणासुदीत दागिने घालावी लागत असली तरी अनेक दिवस त्याचा वापर नसेल तर मात्र ती काळवंडतात. त्याची चमक कमी होते. अशी काळपट दागिने घालावी वाटत नाही. सोनाराकडे ही दागिने उजळवण्याचा खर्चही अधिक असतो. पण या दिवाळीत या खास टिप्स वापरुन तुम्ही घरच्या घरी सोने-चांदीची दागदागिने उजळवू शकता.
हे आहेत घरगुती उपाय
सोन्याचा नेकलेस, बांगड्या, कानातील आणि अंगठी चमकवण्यासाठी तुम्हाला फार मोठं साहित्य लागत नाही. वा त्यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही. घरच्या घरी, घरातील काही वस्तूंचा वापर करुन तुम्ही सोने-चांदीच्या दागिन्यांना उजळा देऊ शकता.
टूथपेस्टने करा स्वच्छ
टूथपेस्ट दात स्वच्छ करते. तुम्ही तिचा रोज वापर करता. पण दागिने स्वच्छ करण्यासाठी पण तुम्ही टूथपेस्ट वापरु शकता. एका भांड्यात टूथपेस्ट घ्या. त्यात थोडं पाणी घ्या. पातळ पेस्ट तयार होईल. आता ब्रशच्या सहायाने दागिने स्वच्छ करा आणि नंतर धुवा.
बेकिंग सोडा- व्हिनेगर वापरा
सोने-चांदीच्या दागदागिन्यांना चमक आणण्यासाठी हा उपाय पण उपयोगी पडू शकतो. एका भांड्यात बेकिंग सोडा आणि कोमट पाणी घ्या. ही पेस्ट दागिन्यांवर लावा. प्रथम व्हिनेगरने धुवा आणि पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. दागिन्यांना चमक येईल.
मीठ आणि लिंबाचा रस
एका भांड्यात लिंबाचा रस आणि 3 चमचे मीठ मिसळा. त्यात काही वेळ चांदी ठेवा. यामुळे चांदीवरील काळे डाग दूर होतील आणि चांदीला चमक येईल. सोन्याला चमक येण्यासाठी प्रथम एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात डिटर्जंट टाका. थोडावेळ दागिने त्यात ठेवा. नरम ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. पाण्याने हे दागिने स्वच्छ करा. कपड्याने पुसल्यानंतर त्याला चमक आलेली दिसेल.
ब्लीच वापरु नका
सोन्याची दागिने स्वच्छ करण्यासाठी ब्लीचचा वापर करुच नका. त्यामुळे सोन्याची दागिने खराब होतील. ती काळवंडतील. सोने नाजूक असते. त्यामुळे ते वापरताना, हाताळताना काळजी घ्या. कोणत्याही केमिकलचा वापर करु नका. त्याने सोने खराब होईल.
टीप : ही केवळ माहिती आहे. याचा वापर करण्यापूर्वी अगोदर तज्ज्ञाचे मत जरुर घ्या.