नवी दिल्ली : अती तेथे माती… ही म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. कोणतीही गोष्ट ठराविक प्रमाणात केली तर त्याचे फायदे असतात, पण एकदा मर्यादा ओलांडून प्रमाण वाढलं की मग त्याचा चांगलाच फटका बसतो. असेच काहीसे खाण्या-पिण्याबाबतही (food) आहे. कोणताही पदार्थ ठराविक प्रमाणात खाल्ला तर ठीक, त्याचे प्रमाण अती झाले तर नुकसान होतंच, पोटालाही त्रास होतो तो वेगळाच. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे मोमोजसारख्या (momos) फास्ट फूडची क्रेझ खूप वाढली आहे. चिकन किंवा व्हेज याव्यतिरिक्त, भारतातील लोक तंदुरी मोमो आणि तळलेले मोमो मोठ्या आवडीने खातात. तरुण पिढीचे हे तर अतिशय आवडतं स्नॅक्स (snacks) मानले जाते.
मोमोज आवडणाऱ्यांची कमी नसली तरी बहुतांश खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर तरुणांची गर्दी असते. पण टेस्टमध्ये अप्रतिम असलेल्या या आवडत्या पदार्थामुळे कॅन्सरचा धोका संभवतो, हे तुम्हाला माहित आहे का ? असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यानुसार मोमोज जास्त प्रमाणात खाल्ल्यास कॅन्सर, डायबिटीज किंवा इतर आजारांना बळी पडणे निश्चित आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने मोमोज खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात, हे जाणून घेऊया.
मधुमेहाचा धोका
आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मोमोज बनवताना एजोडिकार्बोन आणि बेंजोइल पेरोक्साईड सारखे घटक मैदयात घातले जातात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. मोमोज मऊ ठेवण्यासाठी या हे घटक मैदयात घालावे लागतात. आणि ते घातल्याशिवाय मोमोज मऊ होऊ शकत नाहीत. या रसायनांचा स्वादुपिंडावर थेट परिणाम होतो आणि त्यामुळे इन्सुलिन हार्मोन्स बाहेर पडतात. अशा परिस्थितीत शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते आणि त्यामुळे तुम्ही मधुमेहाचे रुग्ण होऊ शकता.
पाइल्सचा त्रास झाला तर बसण्याचे होतील वांदे
मोमोज हे मुख्यत: वाफवून तयार केले जातात, पण त्याचे इतरही अनेक प्रकार असतात की. पण मुळात मोमोजमध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूड वापरले जाते. त्यातील फायबरच्या कमतरतेमुळे, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होऊ शकतो आणि तो दीर्घकाल राहिल्यास मूळव्याधाची समस्याही उद्भवू शकते. मोमोजसोबत तोंडी लावायला मिळणारे मसालेदार सॉस हे देखील मूळव्याधचे कारण बनते.
कॅन्सरची रिस्क
मोमोजची चव सुधारण्यासाठी, ते आणखी चविष्ट बनवण्यासाठी त्यात अजिनोमोटो घातले जाते. या रसायनामुळे कर्करोगाचा अर्थात कॅन्सरचा धोका असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. साधारणपणे प्रत्येक चायनीज फूडमध्ये अजिनोमोटो केमिकल टाकलं जातं आणि ते खूपच धोकादायक ठरू शकतं.
हाय ब्लड प्रेशर
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मोमोजसोबत दिला जाणारा सॉस किंना मसालेदार चटणी दिली जाते, ती खाल्ल्यामुळेही उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. त्याला काही फार चव नसते, तरीही लोकं ती मोठ्या आवडीने खातात. त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे ब्लड प्रेशरची पातळी वाढू शकते.
म्हणूनच मोमोजचे अती प्रमाण, ते जास्त खाणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.