नवी दिल्ली – चमकदार त्वचा (glowing skin) मिळावी यासाठी आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. पण ही उत्पादने केवळ महागच नसतात, तर त्यामध्ये वापरण्यात आलेल्या अनेक रसायानांमुळे (chemicals in beauty products) आपल्या त्वचेचे भविष्यात नुकसानही होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्याची व त्वचेचू निगा राखताना तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचाही वापर करू शकता. या पदार्थांचा वापर केल्याने काही दुष्परिणाम होत नाहीतच, पण त्वचाही चमकदार होण्यास मदत होते. या पदार्थांच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक (natural glow) मिळण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमे यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते. वीकेंडला या पदार्थांचा वापर करून त्वचेचे थोडे लाड तर करा, पहा तुमची त्वचा कशी चमकेल ते !
त्वचेची काळजी घेण्यासाठी काही फेसमास्कचा वापर उत्तम ठरू शकतो.
कोरफडीचा फेस मास्क
कोरफडीचे किती वेगवेगळे उपयोग आहेत ते सर्वांनाच माहीत आहे. खाण्यापासून ते त्वचेवर व केसांवर लावण्यापर्यंत कोरफडीचा वापर करता येतो, त्यातील पोषक व चांगल्या गुमधर्मांमुळे ती बहुगुणी ठरते. त्यामुळे चेहऱ्यासाठी तुम्ही कोरफडीच्या जेलचा फेस मास्क वापरू शकता. त्यासाठी एका भांड्यात एक चमचा कोरफडीचे जेल घेऊन त्यामध्ये एक चमचा मध घाला. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि हा फेस पॅक चेहरा आणि मानेला लावा. तो अर्धा तास चेहऱ्यावर राहू द्या. नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास तसेच तुमच्या त्वचेचे उन्हापासून संरक्षण करण्यास मदत करतो.
ओटमील फेस मास्क
एका भांड्यात एक छोटा ओटमीलचे पीठ घ्या, त्यामध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑईल व 1 चमचा मध घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा. हा फेस पॅक चेहरा आणि मानेला लाऊन हळूवार हाताने त्वचेला मसाज करा. यानंतर चेहरा व मान साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता.
बेसन व दूध
हानपणापासूनच आपण अंघोळीसाठी बेसन व दुधाचा वापर करतो. यामुळे त्वचा तर उडळतेच पण ती मऊ आणि स्वच्छही होते. हा फेसपॅक तयार एका भांड्यात 2 चमचे बेसन घ्या. त्यात कच्चे दूध घाला. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि चेहऱ्यावर नीट लावून, 10 ते 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. वाळल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करेल. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा फेस पॅक तुम्ही वापरू शकता.
चंदन आणि गुलाब
चंदनाचे गुणधर्म सर्वांनाच माहीत आहे, त्याच्या वापराने त्वचाही चमकते. हा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात थोडं गुलाबजल घाला व दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. हा पॅक सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. त्यामुळे त्वचा मऊ व चमकदार होण्यास मदत मिळेल.