कर्नाटक राज्यात नुकतीच पाणी पुरी आणि इतर खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रस्त्यांवरील खाद्यपदार्थांसह चांगल्या पॉश रेस्टॉरंटमधील अनेक खाद्यपदार्थांचे नमूने तपासले गेले. त्यावेळी पाणीपुरीतील पाण्याला रंग देण्यासाठी कृत्रिम रंग वापरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच कॉटन कँडी लहान मुले आवडीने खातात या कॉटन कँडीसाठी देखील वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम रंगात चक्क रोडामीन – बी नामक घटक आढळला आहे या घटकामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण मिळत असल्याचे उघडकीस आले आहे.
खाद्यपदार्थांमधील रासायनिक रंगांमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कर्नाटक सरकारने रोडामीन – बी नामक फूड कलरवर नुकतीच बंदी घातलेली आहे. या कृत्रिम रंगातील रोडामीन – बी ( Rhodamine – B ) नामक घटकाने मानवी शरीरावर दीर्घकालीन परीणाम होतात. त्यात कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला निमंत्रण मिळत असल्याचे भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने ( FSSAI ) म्हटले आहे.
रोडामीन बी हा रंग तयार करणारा घटक आहे. त्याचा वापर टेक्सटाईल, पेपर आणि चामडे कमविण्याच्या उद्योगात होतो. हा रंग अतिशय स्वस्त मिळत असतो. हा रंग कमी प्रतिचा आहे आणि अनेक वेळा रस्त्यांवर गाड्यांपासून मोठ्या हॉटेलात चायनीजच्या नावाखाली विकले जाणाऱ्या कोबी मंच्युरियन किंवा कॉटन कँडी सारख्या लोकप्रिय स्ट्रीट फूडला आकर्षक चमकदार रंग येण्यासाठी हा घटक निर्धास्तपणे वापरला जात असतो.
‘कॉटन कँडी’ म्हणजे आपण लहानपणी आवडीने खायचो तो गोड कापूस किंवा बुढ्ढी के बाल, म्हातारीचे केस अशी अनेक नावे त्याला दिलेली असतात पूर्वी रस्त्यांवर फेरीवाले कापूस तयार करण्यासाठी लाकडी डमरूच्या आकाराच्या स्टँडवर एल्युमिनियच्या भांड्यात मध्यभागी स्टोव्हसारखा बर्नर असायचा त्याच्या आता चमच्याने रंगीत साखर टाकलेली असायची. तो बर्नर वेगाने फिरायचा आणि त्याच्यातून उडलेल्या तुषारांतून भांड्याच्याकडेला कापूस जमायचा. मग हा कापूस आईस्क्रीमच्या स्टीकने लपेटून हा म्हातारीचा कापूस विक्री केला जायचा. काही प्रदेशांमध्ये त्याला कँडी फ्लॉस किंवा फेअरी फ्लॉस म्हणून देखील ओळखले जाते, ही एक प्रकारची साखर मिठाई आहे. ‘कॉटन कँडी’ ही मॉलमध्ये किंवा कार्निव्हल, जत्रा आणि अॅम्युजमेंट पार्कमध्ये देखील विकली जात असते.
कर्करोगास कारणीभूत असलेल्या घटकांची यादी जागतिक आरोग्य संघटनेने तयार ( WHO ) केली आहे. हे घटक मानवांसाठी कार्सिनोजेनिक म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, परंतू मानवासारखाच सस्तन प्राणी असलेल्या उंदरांवर काही अभ्यास करण्यात आले आहेत. त्यात या घटकांची चाचणीत कर्करोग जन्य प्रभाव आढळले आहेत.
हे घटक सामान्यतः अन्न उत्पादनांमध्ये मोडत नाहीत. रोडामाइन – बी लहान शहरांमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या विक्रेत्यांकडे ते अन्नपदार्थांना रंग देण्याासाठी वापरले जाते. अन्नपदार्थांमध्ये वापरण्याची परवानगी नसल्याचे माहिती नसल्याने हे घडते. लहान विक्रेत्यांना हा रंग मानवी जीवनास हानिकारक असू शकतो हे माहिती नसते. कारण त्याचे परिणाम नेहमीच लगेच जाणवत नाहीत. कोबी किंवा गोबी मंचुरियन, बटाटा वेज, बटर चिकन, डाळींबाचा रस, मेवाड आईस्क्रीम किंवा कॉटन कँडीज यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये ते सर्रास बेकायदेशीरपणे वापरले जाते.
फूड सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडियाने ( FSSAI ) अन्नपदार्थांमध्ये फार कमी नैसर्गिक आणि कृत्रिम ( सेन्थेटिक ) रंगांचा वापर करण्याची परवानगी दिली आहेत.
कॅरोटीन आणि कॅरोटीनॉइड्स ( पिवळा, नारिंगी ) : हा रंग घटक गाजर, भोपळे आणि टोमॅटो यासारख्या अनेक फळभाज्यांमध्ये आढळतो. यापासून तयार होणारा रंग हा नैसर्गिक रंगद्रव्य असून. अन्न पदार्थांमध्ये पिवळा, केशरी आणि लाल रंगांसाठी हा घटक वापरला जातो.
कॅरामेल : कॅरामेल हे एक नैसर्गिक अन्न रंगद्रव्य घटक आहे. जो साखरेला गरम केल्यानंतर मिळतो. कॅरॅमलायझेशनच्या डिग्रीनुसार त्याचा रंग फिकट पिवळा ते खोल तपकिरी रंगाचा असू शकतो.
ॲनाट्टो ( केशरी – लाल ) : ॲनाट्टो हा एक नैसर्गिक खाद्य रंग आहे जो अचिओट झाडाच्या बियापासून तयार केला जातो. हा अन्न पदार्थांना नारिंगी – लाल रंग देतो आणि सामान्यतः चीज, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरला जातो.
केसर : केसर हा केसरच्या फुलापासून ( क्रोकस सॅटिव्हस वनस्पती ) तयार केलेला मसाल्याचा पदार्थ आहे. केसराच्या फुलांचे पुंकेसर वापरुन दाट केशरी रंगा तयार केला जातो. जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी केसर एक आहे. ते अनेक अन्नपदार्थांना रंग देण्यासाठी वापरले जाते.
कर्क्यूमिन ( पिवळा, हळदीपासून ) : कर्क्यूमिन हे हळदीमध्ये आढळणारा मुख्य सक्रिय घटक आहे. हळद हा मसाला अन्नपदार्थांना पिवळा रंग देण्यासाठी नैसर्गिक खाद्य रंग म्हणून वापरले जाते.
Ponceau 4R : हा एक कृत्रिम लाल रंग आहे. तो सामान्यतः विविध खाद्य आणि पेय उत्पादनांमध्ये वापरला जातो.
Carmoisine : आणखी एक कृत्रिम लाल रंग फूड कलरिंगमध्ये वापरला जातो.
एरिथ्रोसिन : एक कृत्रिम लाल रंग असून तो सामान्यतः अन्नपदार्थांना लाल रंग येण्यासाठी वापरला जातो, विशेषतः मिठाई आणि कँडीमध्ये हा घटक वापरला जातो.
टार्ट्राझिन आणि सनसेट यलो एफसीएफ : सिंथेटिक पिवळे रंग विविध खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
इंडिगो कारमाइन आणि ब्रिलियंट ब्लू एफसीएफ : फूड कलरिंगमध्ये सिंथेटिक निळे रंग वापरले जातात.
फास्ट ग्रीन FCF : अन्न उत्पादनांमध्ये वापरला जाणारा कृत्रिम हिरवा रंग आहे.
अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम रंगांना अन्नपदार्थांना रंग येण्यासाठी वापरले जात असले तरी सर्वच अन्नपदार्थांत हे रंग वापरण्याची परवानगी दिलेली नाही. हे रंग वापरता येतील असे काही ठराविक अन्नपदार्थ आहेत..उदाहरणार्थ अशा खाद्यपदार्थांमध्ये आइस्क्रीम, बिस्किट्स, केक, मिठाई, फळांचे सिरप आणि क्रश, कस्टर्ड पावडर, जेली क्रिस्टल्स आणि कार्बोनेटेड किंवा नॉन-कार्बोनेटेड पेये आदींचा समावेश आहे.
2006 चा कायदा, अन्नाशी संबंधित विविध कायद्यांचे एकत्रिकरण आहे.
अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, 1954, फ्रूट प्रॉडक्ट्स ऑर्डर, 1955, मीट फूड प्रॉडक्ट्स ऑर्डर, 1973 आणि इतर कायदे यांना मिळून तो तयार झाला आहे.
यापूर्वी विविध मंत्रालये आणि विभागांद्वारे हे कायदे हाताळले जात होते. अन्न सुरक्षा आणि मानकांशी संबंधित सर्व बाबींसाठी एकच कायदा असावा यासाठी त्यांचे एकत्रिकरण केले आहे.
FSSAI आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत, भारतात अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेचे नियमन आणि पर्यवेक्षण करून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी जबाबदार आहे.
– FSSAI चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि देशभरातील आठ झोनमध्ये त्याची प्रादेशिक कार्यालये आहेत.
– FSSAI चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे केंद्र सरकारने नियुक्त केलेले असतात. अध्यक्ष हे भारत सरकारच्या सचिव पदावर कार्यरत आहेत.
– अन्न उत्पादने आणि additives साठी नियम आणि मानके तयार करणे.
– अन्न खाद्य व्यवसायांना परवाने आणि नोंदणी प्रदान करणे.
– अन्न सुरक्षा कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करणे
– अन्न सुरक्षा आणि गुणवत्तेचे निरीक्षण आणि पाळत ठेवणे.
– अन्न सुरक्षा समस्यांचे जोखीम मूल्यांकन आणि वैज्ञानिक संशोधन करणे
– अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबद्दल प्रशिक्षण आणि प्रबोधन करणे
– फूड फोर्टिफिकेशन आणि सेंद्रिय अन्नाला प्रोत्साहन देणे.
– अन्न सुरक्षा बाबींवर इतर एजन्सी आणि भागधारकांशी समन्वय साधणे.
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा कोणतेही अन्न पदार्थ तयार करताना काय मानकं असावीत यासाठी तो तयार केलेला आहे. कोणताही खाद्य पदार्थ तयार करताना पाकिटांवर किंवा उत्पादनांवर त्यात कोणते घटक आहेत. याची यादी उत्पादनावर प्रसिद्ध केली पाहीजे. परंतू या अन्न घटकांनी परीणाम काय होतील. याचा दावा करु नये असा कायदा सांगतो. आपण दिवसांतून साधारणपणे तिनदा अन्न जेवतो. परंतू आपल्याला आपल्या परिसरात अन्न सुरक्षा अधिकारी कोण आहे. त्याचा नंबर काय आहे. हे माहिती नसते असे अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी म्हटले आहे.