ख्रिसमस संपल्यानंतर मुलांची लगबग परीक्षेसाठी होणार आहे. काही मुलांनी तर ख्रिसमसचे सर्व प्लान रद्द करून अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. कारण त्यांची बोर्डाची परीक्षा आहे. त्यामुळे अभ्यास एके अभ्यास हे सध्या सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास केल्यावर त्यांच्या मनावर ताण येऊ शकतो. त्यामुळे त्यांना टेन्शन येऊ शकतं. अशावेळी मुलांनी शांतपणे अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी त्यांचं मन आणि चित्त स्थिर आणि शांत हवं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी काही योगा करणं गरजेचं आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटात करण्याजोगे हे योगा आहेत. ते केल्यास मन आणि चित्त शांत राहीलच पण विद्यार्थ्यांना अधिक मेमरी पॉवर मिळेल.
प्राणायाम
विद्यार्थ्यांची दिवसाची सुरुवातच अत्यंत आल्हाददायक झाली पाहिजे. सकाळी उठल्यावर त्यांनी 10 ते 20 मिनिटे प्राणायाम करायला हवे. यामुळे मुलाचे मन शांत होते, त्याच्या मनात स्पष्टता येते. हे केल्याने मेमरी स्ट्राँग बनते. अभ्यासही दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो याशिवाय, दीर्घ श्वास घेतल्याने स्ट्रेस, पॅनिक अटॅक आणि घबराहट टाळता येते.
ताडासन
ताडासन हे एक महत्त्वाचे आसन आहे, या आसनामुळे मेंदू सक्रिय राहतो, तसेच हे शरीर आणि मन यांना कनेक्ट करण्यावर लक्ष केंद्रित होतं. यासाठी, जमिनीवर सरळ उभं राहा, दोन्ही पाय एकत्र ठेवा आणि दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. संपूर्ण शरीर स्थिर ठेवा. दोन्ही पायांवर समान वजन ठेवा, दोन्ही हाताच्या अंगठ्या एकत्र करा आणि ते वर उचलून श्वास भरतांना हात उंच करा. पायाच्या टाच वर उचलून बोटांवर संतुलन ठेवा. काही वेळ थांबून नंतर श्वास सोडत हात खाली आणा.
वृक्षासन
वृक्षासनामुळे शरीराचे संतुलन राखले जाते. या आसनामुळे मनावर लक्ष केंद्रीत होतं. हे आसन करण्यासाठी सकाळी सूर्याच्या दिशेने उभं राहा, दोन्ही हात हवेत उचलून, उजव्या गुडघ्याला वळवून ते डाव्या पायाच्या टाचेवर ठेवा. दोन्ही हात खांद्याच्या पातळीवर उचलून, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ठेवा. नंतर हातांना नमस्तेच्या पद्धतीने उचलून ठेवून, श्वास नियंत्रित करत शरीर स्थिर ठेवा आणि एक ठराविक बिंदूवर लक्ष केंद्रित करा.
पश्चिमोत्तासन
मुलांना अभ्यास करून पाठ आणि कंबर दुखण्याचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी हे आसन अत्यंत उत्तम आहे. कारण हे शरीराच्या पोश्चरला आणि आकाराला सुधारण्यास मदत करते. यामुळे मनातील नकारात्मकतेला कमी करण्यात मदत होते आणि मेंदू अधिक तीव्र होतो. यासाठी, योगा मॅटवर बसून पाय सरळ पसरवून ठेवा आणि हात शरीराच्या समांतर ठेवा. दीर्घ श्वास घ्या, आणि हात उचलून, हळूहळू पुढे वाकत जाऊन, पाठीच्या हाडाला वाकू देऊ नका. नंतर श्वास सोडत शरीर पूर्णपणे पुढे वाकवून पायाच्या तळव्यांवर थोड्या वेळासाठी थांबा, नंतर पुन्हा सरळ बसून या आसनातून बाहेर ये.
सर्वांगासन
हे अत्यंत महत्त्वाचे आसन आहे. यात जमिनीवर झोपून संपूर्ण शरीर उचलण्याचा प्रयत्न करावा लागतो. केवळ खांद्यावर शरीर ठेवले जाते. हे आसन करण्यामुळे मेंदू तेज होतो आणि शरीरातील संतुलन सुधारते. या योगाने संपूर्ण शरीराचे फिटनेस सुधारते. त्यामुळे, जर तुमचे मुलं बोर्ड परीक्षा साठी तयारी करत असतील, तर दररोज सकाळी 30 मिनिटे वेळ काढून त्यांना हे पाच आसन निश्चितच करवा.