जुनं वर्ष सरण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. आपण आता काही दिवसातच नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. नव्या वर्षाचे नवे संकल्प आणि नव्या आशा घेऊन आपण या वर्षात जाणार आहोत. पण या नव्या वर्षात जाताना आपल्याला सरत्या वर्षालाही निरोप द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकजण नव्या वर्षाच्या स्वागताचं प्लानिंग करत आहेत. कोणत्या ठिकाणी जाता येईल, बजेटमध्ये कोणती ठिकाणं बसतील याचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लोक फॉरेन टूरचा विचार करत आहेत, काही देशातील इतर भागात जाण्याचा विचार करत आहेत, तर काही लोक राज्यातच कुठे जाता येईल याचा प्लान करत आहेत. अनेकजण राज्यात जाताना प्रसिद्ध ठिकाणेच शोधत आहेत. पण तुम्हाला सांगली हा पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय आहे हे माहीत आहे का? तुम्ही सांगलीत एकदा येऊन बघाच, तुम्हाला फॉरेनचीही आठवण येणार नाही.
सांगली हे महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि सुंदर शहर आहे. सांगलीची हळद आणि हळदीची बाजारपेठ संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच सांगली हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. सांगलीत सुपिक जमीन आहे. त्यामुळे या भागात हिरवीगार वनराई पाहायला मिळते. त्यामुळे पर्यटकांची सांगलीला पहिली पसंती असते. म्हणूनच आम्ही तुम्हाला आज सांगलीची सफर घडवून आणणार आहोत. पिकनिक, थर्टीफर्स्ट किंवा फिरण्यासाठी येणार असाल तर तुम्ही सांगलीला आवश्य या. इथे आल्यानंतर तुम्हाला वेगळाच अनुभव येईल.
सांगलीत आल्यावर दंडोबा हिल्स आणि फॉरेस्ट रिझर्व्ह पाहायला विसरू नका. 28 किलोमीटरपर्यंत हे जंगल पसरलेलं आहे. दंडोबा हिल्स अँड फॉरेस्ट प्रिझर्व्ह हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानलं जातं. कारण या ठिकाणी सर्वत्र हिरवीगार वनराई आहे. दंडोबा फॉरेस्टमधील वातावरण अत्यंत शांत आहे. या ठिकाणचं दृश्य अत्यंत मनमोहक आहे. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी वारंवार येतात. पक्षीप्रेमी आणि प्राणीप्रेमी तर खास अभ्यासासाठी या ठिकाणी येतात. दंडोबाचा डोंगरही अत्यंत सुंदर आहे. दंडोबाच्या डोंगरावर ट्रेकिंग करण्याची मजा काही औरच असते.
अंतर- सांगलीपासून दंडोबा हिल्स अँड फॉरेस्ट प्रिझर्व्ह केवळ 34 किमी अंतरावर आहे.
सांगलीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा तेव्हा लोक सिद्धेवाडी धबधब्याला भेट देतातच. काही लोक तर या धबधब्याला सांगली धबधबाच म्हणतात, इतका हा धबधबा फेमस आहे. सिद्धेवाडी धबधब्यातून 50 फूट उंचावरून जेव्हा पाणी पडते तेव्हा संपूर्ण दृश्य अत्यंत मनमोहक वाटतं. या धबधब्याच्या आजूबाजूला हिरवकंच जंगल आहे. त्यामुळे पर्यटक या धबधब्याकडे येतातच. या ठिकाणी अनेक लोक ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंदही घेतात. पावसाळ्यात तर या ठिकाणचा नजारा पाहण्यासारखा असतो.
सांगलीचं बाहुबली हिल मंदिर हे एक जैन स्थळ आहे. सांगली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकही या पवित्र स्थळी येतात. हे स्थळ अत्यंत पवित्र स्थळ मानलं जातं. हे एक प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी संत बाहुबली यांची 28 फूट उंची मूर्ती आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येतात.
बाहुबली हिल मंदिरात जाण्यासाठी सुमारे 400 शिड्या चढाव्या लागतात. डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. मंदिर परिसरातील वातावरण अत्यंत अल्हाददायक आहे.
सांगली हा जिल्हाच कृष्णा नदीच्या काठावर आहे. कृष्णा नदी ही महाराष्ट्राची जलस्त्रोत आहे. आता ही केवळ नदी राहिली नाही. तर पर्यटनाचा भाग झाली आहे. असंख्य पर्यटक दररोज या ठिकाणी भेट देतात. तुम्हाला सांगली किंवा तुमच्या शहरातील गर्दीपासून शांत वातावरणात जायचं असेल तर कृष्णा नदी परिसरात याच. या ठिकाणची हिरवळ, संथ वाहणारे पाणी, पाण्याची गाज आणि बोचरी थंडी तुम्हाला निरव शांततेचा अनुभव देईल. या ठिकाणी बसल्या बसल्या तुम्ही मासेही पकडू शकता.
तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर सांगलीचा किल्ला पाहाच. सांगलीचा किल्ला हा सांगलीचं मुख्य वैभव आहे. 19व्या शतकात श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन पहिले यांनी सांगली किल्ल्याची बांधणी केली. हा किल्ला गोलाकार आहे. अनेक लोक या ठिकाणी पिकनिकसाठी येतात.