तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल आणि रंगीबेरंगी फुलांच्या बागा पाहण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. श्रीनगर काश्मीर येथे असलेले आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन, या वर्षी 26 मार्च 2024 पासून सर्वसामान्यांसाठी खुले केले जाईल. दरवर्षी लाखो पर्यटक या बागेचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि ट्यूलिप महोत्सवाचा भाग होण्यासाठी येथे येतात. इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन (Indira Gandhi Memorial Tulip Garden) श्रीनगरमधील दल सरोवराच्या काठावर वसलेले आहे आणि ते जगातील सर्वात सुंदर बागांपैकी एक मानले जाते.
येथे हजारो प्रकारचे रंगीबेरंगी ट्यूलिप फुले उमलतात, जी स्वर्गापेक्षा ही बघायला खूप सुंदर वाटतात. जर तुम्ही या वर्षी काश्मीर ट्रिपची योजना आखत असाल तर तुमच्या यादीत ट्यूलिप गार्डनचा समावेश नक्कीच करा. ट्यूलिप गार्डनच्या वैशिष्ट्यांबद्दल, सहलीचे नियोजन, तिकीट बुकिंग आणि तिथे भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखात तुम्हाला सांगणार आहोत.
हे गार्डन आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन आहे जे 30 हेक्टरमध्ये पसरलेले असून तुम्हाला येथे 17 लाखांहून अधिक आणि 75 हून जास्त जातीचे ट्यूलिप फुले पाहायला मिळतील. हे गार्डन दाल सरोवराजवळ आहे जिथून झबरवान टेकड्यांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. आजूबाजूला बर्फाळ शिखरे आणि तलावाचे अद्भुत दृश्य दिसते. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये ट्यूलिप महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात पर्यटकांसाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रम देखील येथे आयोजित केले जातात. ट्यूलिप व्यतिरिक्त, डॅफोडिल्स, हायसिंथ्स, नार्सिसस आणि इतर परदेशी फुलांच्या अनेक जाती येथे पाहायला मिळतात.
श्रीनगरचे ट्यूलिप गार्डन दरवर्षी फक्त 1 महिन्यासाठी पर्यटकांना बघण्यासाठी उघडतात. कारण ट्यूलिप फुलांचे आयुष्य खूपच कमी असते. हे उद्यान सहसा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या शेवटपर्यंत उघडे असते. जर तुम्हाला ट्यूलिपची फुले पूर्ण बहरलेली पहायची असतील तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत तिथे जाणे चांगले.
ट्यूलिप गार्डन उघडण्याची वेळ सकाळी 9 वाजता आहे आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहते. जर तुम्ही तेथील तिकिटाच्या किमतीबद्दल सांगायचे झाले तर मोठ्यांसाठी ७५ रुपये आणि मुलांसाठी ३० रुपये आहे. तिकिटाची किंमत वेगवेगळी असू शकते. हे लक्षात ठेवा.
येथे पोहोचण्यासाठी, श्रीनगरचे सर्वात जवळचे विमानतळ श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ (SXR) आहे, जे देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. ट्यूलिप गार्डन विमानतळापासून सुमारे 18 किमी अंतरावर आहे, जिथे टॅक्सी किंवा स्थानिक कॅबने सहज पोहोचता येते. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्हाला जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल जे श्रीनगरपासून सुमारे 270 किमी अंतरावर आहे. तिथून तुम्ही कॅब किंवा बसने श्रीनगरला पोहोचू शकता. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जात असाल किंवा बसने प्रवास करत असाल तर तुम्ही राष्ट्रीय महामार्ग-44 द्वारे सहजपणे श्रीनगरला पोहोचू शकता.