How to relax Stiff Spine in Office : ऑफीसमध्ये (Office work)लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर बराच काळ बसून काम करणे अतिशय थकवणारे असते. तासनतास एकाच जागी बसून काम केल्याने शरीर आखडतं (stiff body). पाठदुखी, खांदेदुखी, मानदुखी अशा वेगवेगळ्या समस्या भेडसावू लागतात. त्यामुळे रिलॅक्स होऊन चांगले काम करणे अधिकच कठीण होते. घरी जाऊन व्यायाम अथवा योगासने करण्यास सगळ्यांनाच वेळ मिळतो असेही नाही. रिलॅक्स होण्यासाठी दरवेळेस बाहेर जाऊन पाय मोकळं करणं शक्य नसतं. त्यामुळे शरीरातील दुखणं अजूनच वाढतं. अशावेळी खुर्चीवर बसल्या बसल्याच काही साधे सोपे व्यायाम, स्ट्रेचिंग (stretching exercise)केलं तरी बराच फरक पडू शकतो. यासाठी फारसा वेळही लागत नाही. अवघ्या काही मिनिटांच्या स्ट्रेचिंगमुळे शरीरातील स्नायू रिलॅक्स होतात आणि पाठ, मान, खांदेदुखी कमी होण्यास मदत होते.
ऑफीसमध्ये बराच काळ खुर्चीवर बसून काम करावे लागते. सतत एकाच पोश्चरमध्ये बसल्याने अंग आखडतं. तासनतास बसून राहिल्याने पाठ, हात आणि मान खेचल्यासारखी वाटत असेल किंवा हाडे दुखत असतील तर थोडा वेळ खुर्ची मागे करून स्ट्रेचिंग करावे.
योगासने तज्ज्ञ शीतल तिवारी यांनी या संदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आखडलेलं शरीर, पाठीचा मणका कशा पद्धतीने रिलॅक्स करावा, त्यासाठी स्ट्रेचिंग कसे करावे, हे त्यात दाखवण्यात आले आहे. यामुळे शरीर तर सैलावतंच पण मनही रिलॅक्स झाल्याने ताण कमी होतो. तसेच पाठदुखीचा त्रासही कमी होतो.
– सर्वात पहिले खुर्चीवर ताठ बसा आणि पायांचे तळवे जमिनीवर पूर्णपणे टेकवा.
– आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकांमध्ये गुंफून वरच्या बाजूला स्ट्रेच करा.
– नंतर दोन्ही हात (एकमेकांमध्ये गुंफलेल्या अवस्थेतच) पुढच्या बाजूला स्ट्रेच करा आणि तसेच मागच्या बाजूलाही खेचा.
– आता दोन्ही एकमेकांमधून सोडवा आणि हात मागच्या बाजूला वरती खेचा. तुमची मानही वरच्या बाजूला स्ट्रेच करा आणि पाठीचा कणा ताठ ठेवा.
– थोड्या वेळाने दोन्ही हात तुमच्यासमोरील डेस्कवर ठेवा. मान जमिनीच्या दिशेने खाली करा आणि पाठीचा कणा ताठ ठेवत स्ट्रेच करा.
– हे स्ट्रेचिंग दिवसातून 2 ते 3 वेळा केल्यास आखडलेलं शरीर सैलावायला मदत होईल. आणि पाठीचा, मानेचा त्रास कमी होऊन ऑफीसचे काम अधिक कार्यक्षमतेने करता येईल.