My Name is Jaan : ‘गौहर जान’ यांच्या जीवनावर आधारित म्युझिकल प्ले रसिकांना भुरळ घालण्यास सज्ज

| Updated on: Oct 23, 2024 | 10:10 AM

भारतातील पहिले गाणे रेकॉर्ड करणाऱ्या प्रख्यात गायिका गौहर जान यांच्या जीवनावर आधारित 'My Name is Jaan' ( माय नेम इज जान) हा म्युझिकल प्ले आहे. लाइव्ह परफॉर्मन्स आणि इमोसनल स्टोरीटेलिंग असलेला हा विलक्षण अनुभव असेल, न चुकवण्यासारखा.

My Name is Jaan : गौहर जान यांच्या जीवनावर आधारित म्युझिकल प्ले रसिकांना भुरळ घालण्यास सज्ज
‘माय नेम इज जान’
Follow us on

आज भारतातील अनेक गायिकांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने रसिकांना वेड लावलं आहे. एकेका गाण्यासाठी आजच्या गायिका लाखो रुपये आकारतात, पण 100 वर्षांपूर्वी एक अशी गायिका होऊन गेली जिने आजच्या काळातील सुमारे एक कोटींचे मानधन घेतलं होतं. 1902 साली भारतातील पहिले गाणे रेकॉर्ड करणाऱ्या प्रख्यात गायिक गौहर जान यांची किर्ती जगभरात पसरली आहे. त्यांच्याच आयुष्यावर आधारित, त्यांचा वारसा सांगणारं ‘माय नेम इज जान’ हे संगीत नाटक मुंबईतील प्रेक्षकांना भुरळ घालण्यास  सज्ज आहे.  गौहर जान यांच्या विलक्षण जीवनाचा, त्यांचं यश आणि त्यांना सामना कराव्या लागलेल्या विविध परिस्थितीचा या अतिशय मनमोहक नाटकात आढावा घेण्यात आला आहे. तसेच त्यांची सर्वात प्रसिद्ध, प्रतिष्ठित 11 गाणी त्यामध्ये लाईव्ह परफॉर्मन्सद्वारे सादर करण्यात येणार असून त्यातच संपूर्ण आयुष्याचं कथानक गुंफलेलं आहे. गौहर जान यांना भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांना मिळालेली प्रसिद्धी, त्यांची सुरूवात कशी झाली ते त्या नॅशनल सेन्सेशन कश्या बनल्या, हे सुप्रसिद्ध अभिनेत्री अर्पिता चॅटर्जी भूमिकेतून सादर करणार आहेत.

अर्पिता चॅटर्जी या एक अष्टपैलू कलाकार आहेत. त्या केवळ अभिनेत्रीच नव्हेत तर शास्त्रीय नृत्यांगना आणि उत्कृष्ट शास्त्रीय गायिकाही आहेत. भारतीय परफॉर्मिंग आर्ट्समध्ये त्या एक उत्कृष्ट कलाकार म्हणून विख्यात आहेत. उस्ताद रशीद खान आणि पंडित अरुण भादुरी यांसारख्या नामवंतांकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलं आहे.

कोण होत्या गौहर खान ?

1873 साली जन्मलेल्या गौहर खान या अतिशय विख्यात गायिका होत्या. त्यांनी त्या काळातील उत्कृष्ट उस्तादांकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतलं. त्यांनी वृंदानिनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थकमध्ये प्रभुत्व मिळवलं. ख्यालचे बारकावे भैय्या गणपत यांच्याकडून शिकली, तर सृजन बाईंकडे धृपद शिकली आणि श्री रमेशचंद्र दास यांच्याकडून कीर्तनात कौशल्य प्राप्त केलं.

‘माय नेम इज जान’ या म्युझिकल प्ले मध्ये त्यांच्या आयुष्यातील हेच क्षण सुंदररित्या कॅप्चर करण्यात आले असून त्यांना मिळालेले स्टारडम, त्यांचा उदय कसा झाला याचेही ज्वलंत चित्रण यात करण्यात आलं आहे. हिंदी, बंगाली आणि इंग्रजी या भाषांमध्ये त्यांनी लीलया गाणी पेलली, त्यातूनच त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व दिसून येते, या पैलूवरही नाटकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

हा परफॉर्मन्स म्हणजे गौहर जान यांना केवळ श्रद्धांजली नव्हे तर त्यापेक्षाही कितीतरी अधिक आहे. त्यांना आयुष्यात करावा लागलेला संघर्ष, अयशस्वी नातेसंबंध यापासून त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस आलेल्या आर्थिक अडचणी, त्यांचा सामना त्यांनी कसा केला याचा संपूर्ण लेखाजोखा यामध्ये मांडण्यात आला आहे. मात्र या आव्हानांनी खचून न जाता त्यांनी धीटपणे सामना केला आणि ग्रामोफोनवर आपला आवाज रेकॉर्ड करणारी पहिली भारतीय गायिका म्हणून त्या कायमच्या अमर झाल्या.

या अतिशय सशक्त कथानकात अर्पिता चॅटर्जी यांनी प्राण फुंकलेत. भावपूर्ण संगीत, कथाकथन आणि भारतीय शास्त्रीय वारशाचा उत्सव यांचा मेळ यात घालण्यात आला आहे.

बूकिंग डिटेल्स

25 ऑक्टोबर 2024 (संध्याकाळी 7:30 वाजता) आणि 27 ऑक्टोबर 2024 (संध्याकाळी 6:30 वाजता) वांद्रे पश्चिम येथील बाल गंधर्व रंग मंदिरात ‘माय नेम इज जान’ हा सुंदर कार्यक्रम होणार आहे. bookmyshow.com वर याची तिकीटे विक्रीसाठी उपलब्ध असतील. भारतातील महान गायिकेला वाहिलेली श्रद्धांजली अनुभवण्यासाठी नक्की उपस्थित रहा.