मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव ( नाशिक ) : विमानात ( Airplanes ) बसून प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असतं. मात्र, ते स्वप्न पूर्ण होईलच की नाही याची काही खात्री नसते. त्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असतील. त्यामध्ये सर्वाधिक महत्वाचे कारण असतं ते म्हणजे आर्थिक परिस्थिती. त्यामुळे बहुतांश जणांची ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. पण नाशिकमध्ये मोलमजूरी करणाऱ्या 11 महिलांना विमान प्रवास ( Air travel ) करत हवाई प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. ज्या महिलांनी कधी स्वप्नात सुद्धा विमान प्रवास केला नाही अशा महिलांना हवाई प्रवास करायला मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अकरा महिलांना महिला दिनाचे औचित्य साधून हा प्रवास करायला मिळाला आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या महिला पहिल्यांदाच थेट नाशिकहून हैदराबादची सफर करणार आहे. विमान प्रवास करून महिला हैदराबाद शहरात फिरणार आहे. दररोज शेतातील काम करणाऱ्या महिला अचानक हवाई प्रवास करून दुसऱ्या राज्यात गेल्या आहे.
शेतात राब राब राबणे, आठवडे बाजार असेल तर कधीतरी शहरात जाणे होतं. याशिवाय उपचारासाठी किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकपर्यन्तचा प्रवास करणाऱ्या या महिला हैदराबाद गाठणार आहे. ते देखील स्वप्नात सुद्धा विचार केला नाही असा प्रवास करून त्या आनंद लुटणार आहे.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे भाजप जिल्हाध्यक्ष आणि आशापुरी महिला पथसंस्थेच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. तळागळातील महिलांना ही संधी घे भरारी उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोलमंजूरी करणाऱ्या अकरा महिलांना ही संधी देण्यात आली आहे.
आज सकाळी नाशिकच्या ओझर विमानतळ येथून या सर्व महिला भरारी घेणार आहे. तीन तिवसांची हैदराबादची सफर घडवून आणणार आहे. मोलमजुरी करत असतांना कधी स्वप्नात सुद्धा विमान प्रवास करायला मिळेल अशी स्थिती नसल्याने अचानक अशी संधी मिळाल्याने महिलांकडून आभार मानले जात आहे.
नाशिकच्या जिल्ह्यातीलच या सर्व महिला असून महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घे भरारीच्या माध्यमातून अनोखा उपक्रम राबविला गेल्याने या संपूर्ण उपक्रमाचे जोरदार कौतुक केले जात आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच असा आगळा वेगळा उपक्रम झाल्याने त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा असा सन्मान करण्याची संधी मिळाल्याने आयोजकांनीही आभार मानत महिलांना महिला दिनाची खास भेट दिल्याचे म्हंटलं आहे.