आपल्याकडे विविध प्रकारचे मसालेदार आणि चवदार पदार्थ बनवले जातात. आपण ते सगळे आवडीने खातो. कधी कधी जेवताना आपल्या कपड्यांवर तेलकट, मसालेदार पदार्थाचे डाग पडतात. अश्याने या हट्टी डागामुळे आपले अनेक कपडे खराब झालेत. अनेकदा वारंवार डाग पडलेले कपडे धुऊन देखील डाग जात नाही. खरं तर जिद्दी डागामुळे कापड खराब होणं ही काही नवी गोष्ट नाही. अनेकदा लोकांच्या बाबतीत असं घडतं. अशावेळी चांगल्या डिटर्जंट पावडरने कपडे धुतल्यानंतरही हे डाग निघून जाण्याचे नाव घेत नाहीत.
चहा, कॉफी किंवा थंड पेय पिताना कधीतरी तुमच्या हातातून सांडून कपड्यांवर पडते आणि मग कपड्यांवर लागलेले डाग धुऊनही जात नाही, अनेकवेळा कपडे अशा प्रकारे खराब होतात की ते पुन्हा घालायला राहत नाहीत. जर अजूनही तुमच्याबाबतीत असे घडत असेल आणि या हट्टी डागांपासून सुटका कशी मिळवायची हे जाणून घ्यायचे असेल तर येथे 5 सोप्या टिप्स आहेत.
आपल्या स्वयंपाकघरात असलेला बेकिंग सोडा कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी खूप मदत करतो. सर्वप्रथम कपड्यावर ज्या भागात डाग लागलेला आहे तो भाग पाण्यात भिजवा. यानंतर एका भांड्यात १-२ चमचे लिंबाचा रस घालून बेकिंग सोडा टाका आणि हे मिश्रण तयार झाल्यावर कपड्यांवरील डागांवर लावा. १० मिनिटे असच ठेवा. त्यानंतर ते पाण्याने धुऊन काढा. याने तुमच्या कपड्यावरील डाग काही मिनिटातच निघून जाईल.
व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही जिद्दी डागांपासूनही सुटका मिळवू शकता. कपड्याच्या ज्या भागावर डाग आहे त्या भागावर व्हिनेगर लावून 5 मिनिटे असच ठेवा. नंतर त्यावर लिंबाचा रस किंवा मीठ चोळा आणि पुन्हा १० मिनिटे सोडा. यानंतर पुन्हा एकदा पाण्याने कपडे धुवून घ्यावेत. याशिवाय केवळ मीठाचा वापर करून ही तुम्ही कपड्यांवरील डाग दूर करू शकता.
कपड्यांवरील हट्टी डाग दूर करण्यासाठी मीठ हा एक उत्तम पर्याय आहे. डाग लागलेल्या भागावर १ चमचा मीठ टाकून त्यावर अर्धा लिंबू चोळल्यास कपड्यावरील डाग सहज निघुन जाईल आणि तुमचे काम मस्त होईल. यानंतर साध्या पाण्याने एकदा कपडे धुवून घ्यावे.
तसेच डाग दूर करण्यासाठी टूथपेस्ट देखील एक चांगला पर्याय आहे. डाग लागलेल्या भागावर टूथपेस्ट ५ मिनिटे लावा, नंतर ब्रशच्या साहाय्याने चोळून धुवून टाकावे. अश्याने तुमच्या कपड्यांवरील डाग निघून जातील.
डाग दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. प्रथम डागावर लिंबाचा रस लावा, नंतर थोडा वेळ असेच राहू द्या त्यानंतर साबणाने चांगले चोळा आणि नंतर धुऊन घ्या. असे केल्याने कपड्यावरील डाग दूर होईल.