नवी दिल्ली – हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकल्याचा (cough and cold) त्रास होणे ही सामान्य गोष्ट आहे, पण लहान मुलांना याचा जास्त त्रास होतो. सर्दी, सतत होणारा खोकला, सर्दीमुळे चोंदलेले किंवा सतत वाहणारे नाक , डोकेदुखी यामुळे लहान मुलं बेजार होतात. आणि मुलांची तब्येत बिघडली तर आई-वडीलही अस्वस्थ होतात, त्यामुळे घरचे वातावरण बिघडते. मुलांची काळजी घेताना त्यांच्या खाण्यापिण्याकडेही (food habits) विशेष लक्ष दिले पाहिजे. व्हिटॅमिन सी सारखी महत्त्वाची पोषक तत्वे (nutrition)असणारे पदार्थ मुलांना द्यावेत.
थंडीच्या दिवसांत मुलांच्या आरोग्यासाठी चांगले ठरतील आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतील असे पदार्थ त्यांना खायला द्यावेत. आज आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यामध्ये पोषक तत्वंही असतील आणि त्यांची चवही चांगली असल्यामुळे मुलं हे पदार्थ मिटक्या मारत नक्की खातील. तुम्ही या पदार्थांचा रात्रीच्या जेवणात समावेश करू शकता.
चिकन सूप
चिकन सूप हे सर्वांच्याच आरोग्यायासाठी फायदेशीर असते. त्यामधील पोषक तत्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढते. हे सूप तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन, त्यात मीठ व काळी मिरी घालावी व बोनलेस चिकन उकळावे. दुसरीकडे एका कढईत थोडे तेल घेऊन त्यात थोडं जिरे घालावं, हवा असल्यास थोडा कढीपत्ताही टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये लसूण घालून फोडणील करावी. नंतर पाण्यातून चिकन काढून ते किसून घ्यावे. ते पॅनमध्ये घालावे व त्यात थोडा पातीचा कांदाही घालावा. थोड फ्राय केल्यानंतर चिकन स्टार्च पॅनमध्ये टाकावा व त्यामध्येच मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालावे. थोड्या वेळात चिकन सूप तयार होईल.
व्हेजिटेबल दलिया
प्रेशर कुकरमध्ये थोडे तेल घेऊन त्यात जिरं घालावं. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. थोडे परतून झाल्यावर त्यात हिरव्या भाज्या घालून शॅलो फ्राय करा. यानंतर त्यामध्ये ओट्सचं जाडसर पीठ घालून वरतून चवीप्रमाणे तिखट मीठ घालावे. काही वेळ शिजल्यानंतर त्यात योग्य प्रमाणात पाणी घाला. हवे असल्यास त्यामध्ये थोडं व्हिनेगर आणि सोया सॉस घाला. कारण मुलांना त्या चवीचे पदार्थ आवडतात.
पनीरची डिश
पनीरमध्ये कॅल्शिअमसह अनेक आवश्यक जीवनसत्त्वं असतात, जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते. मुलांना आवडत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही पनीर पराठा किंवा पनीर भुर्जी बनवू शकता. पनीर भुर्जी बनवण्यासाठी कढईत तेल घेऊन त्यामध्ये खडा मसाला घाला. नंतर त्यात किसलेले पनीर टाका आणि चवीप्रमाणे तिखट मीठ घालावे. शिजल्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर घालावी. पनीरची ही भुर्जी तुम्ही मुलांना पोळीसोबत खायला देऊ शकता.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)