नवी दिल्ली : आपली त्वचा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी, नियमित काळजी (skin care) घेणे आवश्यक आहे. शरीराप्रमाणेच चेहराही (face wash) रोज नीट धुवावा. पण चेहरा चुकीच्या पद्धतीने धुतल्यास ते तितके उपयुक्त ठरणार नाही. जर चेहरा नीट, स्वच्छ धुतला तर त्यावरील मृत पेशी आणि घाण दोन्ही सहज काढता येते. पण त्वचा स्वच्छ करताना काही चूक झाल्यास, त्यामुळे मुरुमे (pimples) होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या त्वचेचे अधिक नुकसान होते.
उन्हाळा असो किंवा हिवाळा, चेहरा धुताना नेहमी कोमट पाणीच वापरावे. कारण गरम पाणी त्वचेमध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते आणि थंड पाण्यामुळे, प्रॉडक्च तुमच्या त्वचेमध्ये योग्यरित्या शोषले जाऊ शकत नाही. तुमची त्वचा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी चेहरा नियमितपणे धुणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि रॅशेस सारख्या समस्या दूर होतील आणि तो अधिक चमकेल. म्हणून, चेहरा धुताना नकळत होणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्या वेळीच सुधारणे महत्वाचे ठरते.
त्वचारोग तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण या पाच चुका टाळल्या पाहिजेत. आपला चेहरा धुणे सोपे वाटते, परंतु प्रत्यक्षात त्वचा स्वच्छ होण्यासाठी काही नियम असतात. तुमची त्वचा स्वच्छ करताना तुम्ही पाच चुका करू शकता, त्या कोणत्या हे जाणून घेऊया.
या चुका टाळा :
– चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर करू नका.
– आपला चेहरा स्वच्छ करताना खसाखसा चोळू नका.
– चेहरा 30 सेकंदांपेक्षा जास्त काळ धुवू नका.
– चेहरा धुताना केस, कान आणि मान साफ करू नका. त्यासाठी वेगळा वेळ काढा. अन्यथा तेथील घाण चेहऱ्यावर येऊन पिंपल्ससाठी कारणीभूत ठरू शकते.
– त्वचेच्या प्रकारानुसार, योग्य फेसवॉश न निवडणे.
उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी थंड पाणी वापरणे सर्वांनाच आवडते. त्यामुळे गार वाटतं. पण या थंडपणामुळे लोक नकळत चुका करतात. चेहरा धुताना पाण्याच्या तापमानाची विशेष काळजी घेऊन नेहमी कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्याचबरोबर फेसवॉश खरेदी करताना त्वचेची काळजी जरूर घ्या. कोरड्या किंवा तेलकट त्वचेनुसार फेसवॉश निवडला पाहिजे. अन्यथा, फेसवॉश स्वतःच तुमच्या त्वचेचा शत्रू बनू शकतो. शक्य असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचाही त्यासाठी सल्ला घेऊन मगच योग्य फेसवॉश निवडावा.