मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : भारतीयांना अनेक देशात व्हीसा शिवाय प्रवेश मिळत नाही. त्यामुळे व्हीसा कार्यालयात अनेक वेळा खेटे मारावे लागत असतात. परंतू आता पुढील महिन्याच्या 1 डिसेंबर या तारखेपासून व्हीसा शिवाय मलेशियाची सैर करता येणार आहे. भारतासह चीनच्या नागरिकांना देखील व्हीसा शिवाय प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे मलेशियाला जाऊ इच्छीणाऱ्यांना व्हीसा कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज रहाणार नाही. त्यांना मलेशियात व्हीसा फ्री प्रवेशाचा आनंद घेता येणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी रविवारी रात्री उशीरा ही घोषणा केली आहे.
आपल्या अनेक देशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हीसा देखील लागतो. या व्हीसाचे नियम कडक असतात. व्हीसा मिळायला त्यामुळे वेळ लागत असतो. परंतू मलेशियात जाण्यासाठी व्हीसाची अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी आपल्या पिपल्स जस्टीस पार्टी कॉंग्रेसच्या भाषणात ही घोषणा केली आहे. अनवर इब्राहीम यांनी म्हटले आहे की या व्हीसा फ्री प्रवासाची सवलत आता चीनी आणि भारतीय नागरिकांना मिळणार आहे. 30 दिवसांपर्यंत मलेशियात व्हीसाशिवाय रहाता येणार आहे. परंतू व्हीसा फ्री सेवेचा लाभ केव्हापर्यंत मिळणार हे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी सांगितलेले नाही.
मलेशियाने हा निर्णय तेथील पर्यटनवाढीसाठी घेतला आहे. पर्यटनवाढी बरोबर अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या चीनी आणि भारतीय नागरीकांना मलेशियाला जाण्यासाठी व्हीसासाठी अर्ज करावा लागतो. याआधी श्रीलंका आणि थायलंड या देशांनी देखील भारतीयांना व्हीसा फ्री प्रवेशाची घोषणा केली आहे.