देशभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी रंग खेळण्याचा आनंद लुटला. होळी खेळायला खूप मजा येते. परंतु त्यानंतर अंगावर लागलेला रंग काढणं खूप कठीण होते. तसेच त्यात असलेल्या रसायनांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. असे अनेक रंग आहेत जे त्वचेवरून सहाजसहजी निघत नाहीत. आणि खूप प्रयत्नांती के काढले तरी त्वचा कोरडी होऊ लागते. त्यामुळे खाजही येऊ शकते. तुम्हालाही होळी खेळल्यावर असा कोरडेपणा जाणवत असेल तर तुम्ही घरच्या घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून नैसर्गिक फेसपॅक बनवू शकता. ज्यामुळे त्वचेचा ड्रायनेस कमी होण्यास मदत होते.
कोरफड आणि काकडी
कोरफड आणि काकडी कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. 2 चमचे कोरफड जेल आणि एक चमचा काकडीचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावू शकता. पण त्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करू पहा.
चंदन फेस पॅक
जर तुमच्या घरात चंदनाचा फेस पॅक असेल तर हा देखील एक उत्तम पर्याय आहे. चेहऱ्यावर कोरडेपणा जाणवत असेल तर तुम्ही चंदनाचा फेस पॅक देखील वापरू शकता. चंदनाच्या फेसपॅकमध्ये नारळ पाणी किंवा गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
कच्चं दूध आणि हळद
हा पॅक बनवण्यासाठी २ चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात चिमूटभर हळद टाका, हे नीट मिसळा आणि पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
मध आणि कोरफड
एका बाऊलमध्ये एक चमचा मध आणि कोरफड जेल मिक्स करून ते चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेट होण्यास मदत होऊ शकते.
मध आणि दूध
कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठीही हा फेसपॅक फायदेशीर ठरू शकतो. कच्च्या दुधात मध नीट मिसळून त्याची पेस्ट बनवा. हे मिश्र चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिटे ठेवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि कोरडेपणा कमी करण्यास मदत करते.
एक गोष्ट लक्षात ठेवा, की प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो आणि काही नैसर्गिक गोष्टी तुमच्या त्वचेला सूट होतील, तर काही होणार नाहीत. अशा परिस्थितीत तुमच्या त्वचेनुसार फेस मास्क निवडा. कोणतही उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट जरूर करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)