नवी दिल्ली – आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते , त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नही करत असतो. चांगले कपडे घालणं हाही त्याचाच एक भाग. काहींना स्लीव्हलेस तर काहींना अर्ध्या बाह्यांचे कपडे घालायला आवडतात, त्यामध्ये ते दिसतातही छान. पण काही लोकांना असे कपडे घालायला आवडत असूनही केवळ काळसर कोपरांमुळे (dark elbows) ते पूर्ण बाह्यांचे कपडे घालतात. कोपरांवर जमा झालेला मळ घट्ट होतो व त्यापासून सुटका करणे कठीण होते. वॅक्सिंग (waxing) केल्याने हात तर सुंदर दिसतात पण कोपरांचा काळेपणा काही जात नाही.तुम्हाला जर हाताच्या कोपराच्या काळसरपणा घालवायचा असेल तर घरच्या घरी (homemade remedies) काही उपाय करता येतील. हे उपाय नक्कीच लाभदायक ठरतील.
1) दही आणि ओट्स
त्वचेच्या सौंदर्यासाठी तुम्ही अनेकवेळा दही वापरले असेलच ना ! या दुग्धजन्य पदार्थांमध्ये थोडेसे ओट्स मिसळा आणि स्क्रबच्या सहाय्याने ते मिश्रण थोडा वेळ कोपरांवर घासा. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास कोपरांचा काळसरपणा दूर होईल.
2) टोमॅटो आणि मध
टोमॅटो आणि मध हे दोन्ही पदार्थ जितके आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात, तेवढेच ते आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. कोपरांचा काळसरपणा दूर करण्यासाठीही तुम्ही टोमॅटो व मध वापरू शकता. त्यासाठी एक टोमॅटो मिक्सरमधून फिरवून बारीक पेस्ट करून घ्यावी. नंतर त्यामध्ये थोडा मध घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून कोपरांच्या काळसर भागावर नीट लावावे. थोड्या वेळाने मिश्रण सुकल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. नियमितपणे हे उपाय केल्यास कोपरांचा काळेपणा दूर होईल.
3) कोरफड आणि लिंबू
कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, त्याचा अनेक प्रकारे वापरही केला जातो. त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड व लिंबाचा वापर खूप पूर्वीपासून केला जात आहे. त्यामुळे कोपरांचा काळसरपणा दूर करण्यासाठीही हा एक उत्तम उपाय ठरतो. त्यासाठी एका बाऊलमध्ये कोरफडीचा रस किंवा जेल घेऊन त्यात लिंबाचा रस घालून नीट मिक्स करावा. तयार झालेली ही पेस्ट कोपरांवर लावून ठेवावी आणि वाळल्यानंतर हात स्वच्छ धुवावा. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी सतत काही दिवस हा उपाय करत रहावा.
(डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)