Image Credit source: freepik
नवी दिल्ली : पावसाळ्याचा (monsoon) ऋतू सर्वांनाच आवडतो. पण सतत येणाऱ्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच पावसाच्या पाण्यामुळे बाहेरच्या वस्तूच नव्हे तर घरातील वस्तूंचेही नुकसान होऊ शकते. या ऋतूमध्ये ह्यूमिडिटी वाढल्यामुळे घरातील खिडक्या , दरवाजे खराब होऊ शकतात. तसेच आर्द्रतेमुळे स्वयंपाकघरातील पदार्थ, मसाले (spices) हेही खराब होऊ शकतात.
अशा वेळी ओलाव्यामुळे स्वयंपाकघरातील साखर, मीठ (sugar and salt) हे पदार्थ सादळू शकतात, त्यांना पाणी सुटू शकते. आर्द्रतेमुळे हा त्रास होतो. ओलसर साखर वा मीठ वापरणेही कठीण होते. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल आणि साखर , मीठाला पाणी सुटले असेल तर काही टिप्स फॉलो करा. तुमची समस्या दूर होईल.
मीठ, साखर ओलाव्यापासून दूर ठेवण्याचे उपाय
- वातावरणातील ओलाव वाढल्याने पावसाळ्यात साखर ओलसर होते, पाणी सुटू शकते. त्यामुळे साखरेची चवही बिघडू शकते. हे टाळायचे असेल तर साखरेच्या डब्यात 7 ते 8 लवंगा ठेवा. एका कापडात किंवा रुमालात लवंगा ठेऊन त्याची पुरचुंडी बांधून तुम्ही ती साखरेच्या डब्यात ठेऊ शकता. यामुळे साखर ओलसर होणार नाही व ती फ्रेश, कोरडीही राहील.
- साखर ठेवण्याच्या डब्याचे झाकण सैल असेल तर साखर ओलसर होऊ शकते. त्यासाठी साखरेच्या डब्याचे झाकण घट्ट लावा किंवा एअर टाइट कंटेनरमध्ये साखर ठेववी. मीठासाठीही तुम्ही असे कंटेनर किंवा काचेची घट्ट झाकणाची बाटली वापरू शकता. यामुळे पदार्थ ओलसर रहात नाहीत.
- बरेचसे लोक ओल्या हातांनी किंवा चमच्याने साखर काढतात. असे करणे टाळावे अन्यथा त्यामुळे साखर, मीठ ओलं होऊ शकतं. हे जिन्नस काढण्यासाठी नीट पुसलेला, कोरडा चमचा वापरा. त्यामुळे स्वच्छताही राहील. तसेच साखर वा मीठ काढल्यावर बाटलीचे वा डब्याचे झाकण घट्ट बंद करा.
- ज्या भांड्यात तुम्ही साखर किंवा मीठ ठेवाल, त्यामध्ये काही तांदूळ ठेवलेल्या कापडाची पुरचुंडीही ठेवा. तांदळामुळे ओलसरपणा शोषला जातो व जिन्नस कोरडे राहतात.
- तसेच साखरेच्या डब्यात तुम्ही दालचिनीचा तुकडाही ठेऊ शकता. हाच उपाय मीठासाठीही करू शकता. तो फायदेशीर ठरतो.
- डब्यात साखर किंवा मीठ ठेवण्यापूर्वी त्यात आधी ब्लोटिंग पेपरही टाकून ठेवू शकता. नंतर त्यात हे जिन्नस ठेवावेत. ब्लोटिंग पेपरमुळे ओलावा शोषला जातो व पदार्थ सादळत नाहीत किंवा ओलसरही होत नाहीत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)