तुम्हीही आहात अंडरवेट ? वेगाने वजन वाढवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश ठरेल फायदेशीर

| Updated on: Aug 05, 2023 | 4:45 PM

बरेचसे लोक असे असतात, ज्यांचं वजन खूप कमी असतं, आणि वजन वाढवण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागते. काही पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होऊ शकते. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया...

तुम्हीही आहात अंडरवेट ? वेगाने वजन वाढवण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश ठरेल फायदेशीर
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली | 5 ऑगस्ट 2023 : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स 18.5 पेक्षा कमी असतो, तेव्हा त्या व्यक्तीला अंडरवेट (underweight) म्हटले जाते. त्यामुळे अशा लोकांना बऱ्याच वेळेस वजन वाढवण्यासाठी (weight gain) खूप जास्त मेहनत करावी लागते. कमी वजन सहज वाढवता येते, पण वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत लागते, असं बरंच लोकांना वाटतं. पण ते खरं नाही. जेवढी मेहनत एखाद्या व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी लागते, तेवढेच कष्ट वजन वाढवण्यासाठीही करावे लागतात.

BMI चेक तुमच्या वजनाची तुमच्या उंचीशी तुलना केली जाते. जेणेकरून तुमचे वजन कमी आहे, निरोगी आहे की जास्त आहे, हे तपासता येईल. जेव्हा BMI 18.5 ते 24.9 दरम्यान असते तेव्हा ते सामान्य किंवा निरोगी वजन मानले जाते. पण ज्या लोकांचा बीएमआय 25.0 च्या वर आहे त्यांना ओव्हरवेट कॅटॅगरीत ठेवले जाते आणि ज्यांचे बीएमआय 30 पेक्षा जास्त आहे त्यांची कॅटॅगरी लठ् असते.

कमी वजनामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका उद्भवू शकतो. कारण शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक ती पोषक तत्वे मिळत नाहीत. कमी वजन असणाऱ्या लोकांना या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

– कुपोषण

– ऑस्टियोपोरोसिस (हाडं कमकुवत होणं)

– पातळ त्वचा, केसगळती, कोरडी त्वचा

– थकवा

– ॲनिमिया

– अनियमित मासिक पाळी

– वंध्यत्व

– मुदतपूर्व प्रसूती

– वाढ कमी होणे किंवा उशीराने होणे.

कौटुंबिक इतिहास, हाय मेटाबॉलिज्म, जास्त शारीरिक हालचाली, कोणताही जुनाट आजार, मानसिक आजार इत्यादी अनेक कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचे वजन कमी होऊ शकते. वजन वाढवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास वजन वाढूही शकते. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया…

दूध 

दररोज दूध प्यायल्याने आपल्या शरीराला कॅल्शिअमसह फॅट्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. स्नायूंच्या निर्मितीसाठी प्रोटीन्स आवश्यक आहेत. व्यायामानंतर सोया दुधापेक्षा स्किम मिल्कचे सेवन करणे तुमच्या स्नायूंसाठी खूप फायदेशीर ठरते, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.

तांदूळ किंवा भात

तांदूळ हे कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्त्रोत मानले जातात. ज्यामुळे वजन वाढण्यास खूप जास्त मदत होऊ शकते. एक कप तांदूळामध्ये सुमारे 200 कॅलरी असतात. तांदूळ शिजवणे आणि ते पचणेही खूप सोपे असते.

रेड मीट

स्नायूंसाठी रेड मीट खूप फायदेशीर मानले जाते. तसेच ते अमिनो ॲसिडचाही उत्तम स्त्रोत आहे.

नट्स आणि नट्स बटर

वजन वाढवायचे असेल तर जास्त कॅलरी असलेले पदार्थ खावेत. नट्स आणि नट्स बटरमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते, जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. मूठभर बदामामध्ये 7 ग्रॅम प्रोटीन्स आणि 18 ग्रॅम हेल्दी फॅट्स असतात. याशिवाय तुम्ही नट्स बटरचे सेवन करू शकता, यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप जास्त असते.

ॲवाकॅडो

ॲवाकॅडो मध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी हे फळ खूपच फायदेशीर ठरते.
एका मोठ्या ॲवाकॅडो मध्ये 322 कॅलरीज, 29 ग्रॅम फॅट्स आणि 17 ग्रॅम फायबर असते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)