नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत आपली त्वचा आणि केस (dry skin and hair) खूप कोरडे होतात. त्वचेचा कोरडेपणा वाढल्यामुळे ती फाटू लागते. थंडीचा प्रभाव विशेषतः ओठांवर अधिक दिसतो. काही लोकांचे ओठ (cracked lips) इतके फुटतात की कधीकधी त्यातून रक्तस्त्रावही होतो. त्यामुळे हिवाळ्यात ओठांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते. हिवाळ्यात जर तुमचे ओठ फाटत असतील तर काही सोप्या उपायांचा (remedies) अवलंब करू शकता, ज्यामुळे तुमचे ओठ मऊ आणि कोमल बनतील.
बदामाचे तेल लावा
जर तुमचे ओठ खूप फाटले असतील तर त्यासाठी बदामाचे तेल प्रभावी ठरू शकते. बदामाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे ओठांची सूज कमी होऊन फाटलेल्या ओठांचा त्रास कमी होतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर बदामाचे तेल लावावे.
नारळाचे तेल ठरते फायदेशीर
थंडीच्या दिवसात त्वचा खूप फाटू शकते. अशा परिस्थितीमध्ये नारळाच्या तेलाचा वापर प्रभावी ठरू शकते. फाटलेल्या ओठांचा त्रास कमी करण्यासाठी दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा ओठांना नारळाचे तेल लावावे. यामुळे हळूहळू तुमचे ओठ मुलायम होतील.
ओठांना लावा साय
फाटलेल्या ओठांचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही सायीचाही वापर करू शकतात.त्यामुळे तुमचे ओठ लोण्यासारखे मऊ होतील. यासाठी दररोज ओठांवर साय लावून हलक्या हाताने मसाज करावा. काही दिवसांतच याचा परिणाम दिसेल आणि तुमचे ओठ गुलाबी व मऊ होतील.
मध ठरेल उपयुक्त
भेगा पडलेले, फाटलेले ओठ दुरूस्त करण्यासाठी मधाचा वापर करावा. मध लावल्याने तुमचे ओठ खूप मऊ होतील. तसेच ओठांना पडलेल्या भेगाही कमी होतील.
हळद वापरून पहा
मऊ, मुलायम ओठांसाठी हळदीचा वापर करून पहा. हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे तुमचे ओठ सॉफ्ट होतील. त्यासाठी एका वाटीत चिमूटभर हळद घ्यावी. त्यामध्ये एक चमचा दूध घालावे व मिक्स करावे. ही पेस्ट ओठांना लावून मसाज करावा. हे रात्रभर ओठांवर राहू द्यावे. सकाळी उठून ओठ स्वच्छ धुवावेत. यामुळे ओठ खूप मऊ होतील.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)