नवी दिल्ली : खराब जीवनशैली आणि प्रदूषण यांचा आपल्या केसांवर खूप वाईट (hair damages) परिणाम होतो. बाहेरची धूळ, माती, प्रदूषण तसेच खाण्यात पोषक तत्वांचा अभाव, केसांची नीट निगा न राखणे यामुळे दिवसेंदिवस आपल्या केसांचा पोत बिघडतो, ते पांढरे होतात व गळूही (hair fall) लागतात. केसांची नियमितपणे निगा राखण्यासाठी आपण भरमसाठ उपाय करतो, महागडे शांपू, कंडीशनर वापरतो. पण केसांना आतून पोषण मिळत नसेल तर या सर्व उत्पादनांचाही काही फायदा होत नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया केसांना नियमितपणे तेल लावून मालिश (oil massage for hair) करायच्या आणि केस धुण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करायच्या. त्यापैकीच एक घटक म्हणजे शिकेकाई.
केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही शिककाई वापरू शकता. त्यामुळे केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होते. तसेच केसगळतीही कमी होते आणि कमकुवत केसांची समस्या दूर होते. केसांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही शिककाईचा वापर अनेक प्रकारे करू शकता. शिकेकाई तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनवते. रसायनयुक्त पदार्थांऐवजी तुम्ही शिकेकाई वापरू शकता. केसांसाठी शिकेकाईचा विविध प्रकारे वापर कसा कराव, ते जाणून घेऊया.
डोक्यातील कोंड्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी
एका बाऊलमध्ये एक चमचा शिकेकाई पावडर घ्या. त्यात 1 चमचा मेथी पावडर, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, दही आणि आवळा पावडर घाला. या गोष्टी मिक्स करून केसांना लावा. हे मिश्रण केसांवर 2 ते 3 तास तसेच राहू द्या. यानंतर केस स्वच्छ धुवावेत. या पॅकमुळे कोंडा दूर होण्यास मदत होते. तुम्ही हा पॅक आठवड्यातून एकदा वापरू शकता.
कमकुवत केसांच्या समस्येवर करा मात
एका भांड्यात 2 चमचे शिकेकाई पावडर घ्या. त्यात एक चमचा दही मिसळा आणि फेटून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळांशी लावून थोडा वेळ मसाज करा. नंतर ते मिश्रण केसांवर 30 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. हा हेअर पॅकही तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता. यामुळे केसांना पोषण मिळते व ते मजबूत होण्यास मदत मिळते.
केस गळण्याच्या समस्येपासून मिळवा मुक्ती
एका बाऊलमध्ये एक अंडं फोडून घ्या. त्यात शिकेकाई पावडर घाला. या दोन्ही गोष्टी मिक्स करून केसांना लावा. प्रथिने आणि आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेला हा हेअर मास्क तुमचे केस मजबूत करण्यास मदत करतो. तसेच त्यामुळे तुमचे केस निरोगी होतात व केस गळणे कमी करण्यास मदत मिळते.
चमकदार केसांसाठी मास्क
एका भांड्यात 4 चमचे शिकेकाई पावडर घ्या. त्यात मध घाला. हे मिश्रण नीट एकत्र करून तुमचे केस आणि टाळूवर लावा. थोडा वेळ तसेच राहू द्या. यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा हेअर मास्क तुमच्या केसांना पोषण देता आणि केस चमकदार आणि मुलायम ठेवण्यास मदत करतो.